शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पोलीस आयुक्तांच्या नावाने नागपुरात एक कोटीची फसवणूक, सायबर पोलिसांनी अनेकांना अटक केली

पोलीस आयुक्तांच्या नावाने नागपुरात एक कोटीची फसवणूक, सायबर पोलिसांनी अनेकांना अटक केली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 गुन्हेगारी डेस्क

पोलीस आयुक्त आणि एनआयए अधिकाऱ्याच्या नावाचा वापर, एआय आवाजाची नक्कल आणि बनावट लेटरहेड अशा प्रकरणांत नागपूर सायबर पोलिसांनी मुंबई, इंदूर, कानपूर आणि बीडमध्ये कारवाई केली.

नागपूरमध्ये सायबर भामट्यांनी आता थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या ओळखीचाच फसवणुकीसाठी वापर केला आहे. एका व्यक्तीला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवर पोलीस आयुक्तांचा फोटो दाखवून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाशी संबंध असल्याची भीती घालून त्यांच्याकडून 1 कोटी 4 लाख रुपये उकळण्यात आले.

दुसऱ्या एका प्रकरणात एआय तंत्रज्ञानाने एका माणसाच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून 50 लाख रुपयांची फसवणूक झाली. तिसऱ्या प्रकरणात बनावट कंपनीचे लेटरहेड तयार करून बँकेलाही गंडा घालण्यात आला. या तिन्ही प्रकरणांत नागपूर सायबर पोलिसांनी मुंबई, इंदूर आणि कानपूरमध्ये कारवाई करून आरोपींना अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणातील तक्रारदार दीनदयाल नगर येथे राहणारे प्रविरकुमार तालुकदार आहेत. सायबर भामट्यांनी त्यांना फोन केला आणि आपण पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि एनआयए अधिकारी प्रदीप जायस्वाल असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांचा फोटो वापरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करण्यात आला. मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याची भीती तालुकदार यांना दाखवण्यात आली. सतत दबाव टाकून वेगवेगळ्या बँक खात्यांत आरटीजीएसद्वारे 1 कोटी 4 लाख रुपये भरायला लावले गेले. या तपासात नागपूर सायबर पोलिसांनी मुंबईतून दिनेश रावरीया (32) आणि अरविंद गाला (45) यांना अटक केली आहे.

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 2 कोटी 87 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी इन्स्टाग्रामवरील जाहिरातीतून त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर टेलिग्राम ग्रुप आणि एफटीएमओ ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडून गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. त्या व्यक्तीने 33 व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपये गुंतवले. फसवणूक झाल्याचे त्यांना नंतर लक्षात आले.

या प्रकरणात सायबर पोलिसांनी 15 ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातून काका साहेब मोहन दरुंडे याला अटक केली. दरुंडे मोठ्या संख्येने करंट कॉर्पोरेट बँक खाती चालवून ती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देत असे. त्याने दिलेल्या माहितीवरून मुंबईतील बोरिवली येथून भूपेंद्र महावीर जैन आणि योगेश पारसमल जैन यांनाही अटक करण्यात आली. हे दोघे मूळचे राजस्थानातील अजमेरचे असून मुंबईत राहत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सहा दिवस बोरिवलीत सापळा लावला होता. झोमॅटोचे पार्सल देण्याचा बहाणा करून त्यांना पकडण्यात आले. या दोघांनी आरबीएल कॉर्पोरेट खात्यांद्वारे अवघ्या 24 सेकंदांत 39 व्यवहार करून फसवणुकीची रक्कम 38 खात्यांत वळवली होती. दोघांचे हाँगकाँग आणि दुबईतील सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

तिसरा प्रकार हिवरी लेआउट येथे राहणाऱ्या निखिल नखत यांच्या वडिलांसोबत घडला. आरोपींनी समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा फोटो लावून त्यांना व्हॉट्सॲपवर संपर्क केला. एआय व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानाने त्याच व्यक्तीच्या आवाजाची नक्कल केली आणि अडचणीत असल्याचे सांगून पैसे मागितले. आवाज आणि फोटो पाहून विश्वास ठेवल्याने नखत यांच्या वडिलांनी 50 लाख रुपये पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून 29 वर्षांचा नेतराम श्रीराम चडार याला अटक केली.

आणखी एका प्रकरणात ठगांनी थेट बँकेलाच लक्ष्य केले. जरीपटका येथील युनियन बँकेचे व्यवस्थापक यतिंद्र त्रिपाठी यांना एकाने फोन करून आपण उन्नति मोटर्सचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून व्हॉट्सॲपवर पाठवले आणि आरटीजीएसद्वारे 9 लाख 50 हजार रुपये पाठवायला लावले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून 36 वर्षांचा दुर्गाकुमार भगत बहादुर याला अटक केली.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ