सिडकोत ६९ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक
अतिरेकी कारवायांच्या पैशांचा बनाव करून आणि अटकेची भीती घालून सायबर भामट्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एका वृद्धाकडून ११ लाख रुपये उकळले. सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. आधारकार्डचा वापर करून घेतलेल्या सिमकार्डवरून अतिरेकी कारवायांसाठी पैशांचे व्यवहार झाले, असा बनाव रचून त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. हा प्रकार २५ ते २९ सप्टेंबर या काळात हडकोतील नवजीवन कॉलनीत घडला. याप्रकरणी सिडको पोलीस स्टेशनमध्ये सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्याद देणारे हे वृद्ध महावितरणमधून सिनियर ऑपरेटर या पदावरून जानेवारी २०१५ मध्ये निवृत्त झाले. ते पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडांसह राहतात. फिर्यादीनुसार, २५ सप्टेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने आपण डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले.
त्यांच्या आधारकार्डचा वापर करून नाशिकमधील रेणुकानगर येथे सिमकार्ड खरेदी करण्यात आले, असे त्यांना सांगण्यात आले. त्या सिमकार्डच्या आधारे मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडून त्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले आणि हा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात आहे, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.
काही मिनिटांतच त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. खाकी गणवेशातील एका व्यक्तीने आपण नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशनमधील निरीक्षक संदीप राव असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या कथित अधिकाऱ्याने बँक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा आरोप करत, तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घातली. आरबीआयमार्फत बँक खात्यांची चौकशी होणार असून त्यासाठी सहकार्य करावे लागेल, असेही त्यांना सांगण्यात आले. सर्व बँक खाती, एफडी आणि आरडीमधील रक्कम एकाच ठिकाणी जमा करायला सांगण्यात आले. भीतीपोटी फिर्यादी तयार झाले.
अटक टाळायची असेल तर २९ सप्टेंबरला पुन्हा व्हिडिओ कॉल करून रक्कम एकाच खात्यात जमा करा, असे त्यांना सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने फिर्यादींनी सिडको एन-७ येथील पोस्ट ऑफिसमधील १० लाख रुपयांची एफडी मोडली. ही रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यात जमा केल्यानंतर, भामट्यांनी दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर त्यांनी ११ लाख रुपये आरटीजीएस केले.
आठ ते दहा दिवसांत चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील, असे सांगून त्यांना आरबीआयच्या नावाने बनावट पावतीही दाखवण्यात आली. त्यानंतर ६ ऑक्टोबरला वृत्तपत्रात डिजिटल अरेस्टसंदर्भातील बातमी वाचल्यावर आपलीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.