नागपुरात सायबर फसवणुकीत सुमारे 9.88 कोटी लंपास, वकिलासह सहा आरोपींना अटक
नागपूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक केली असून 4,20,61,162 रुपये परत मिळवले आहेत.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणात आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका व्यक्तीच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे 9,88,83,999 रुपये कथितरीत्या काढून घेण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने आधी सायबर सेलकडे आणि नागपूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी बडोदा पोलीस स्टेशनमध्येही तक्रार नोंदवली. तक्रारदार बडोदा येथील रहिवासी असून त्यांचे नाव रमेश कुमार (बदललेले नाव) असे सांगण्यात आले आहे. आरोपी मुकेश कुमार आणि त्याच्या टोळीने त्यांच्या खात्यातून सुमारे 9.88 कोटी रुपये आरटीजीएसने काढले, असा आरोप आहे.
अटक झालेल्यांमध्ये मीरा रोड, ठाणे येथील मुकेश कुमार शामशंकर मिश्र (41), उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील हनुमान कुमार खखनु राम (26), उत्तर प्रदेशातील शिवनी येथील रवि कुमार रामवृक्ष यादव (24), अजीम रफीक मिठानी (26), झारखंडमधील रांची येथील राकेश शैलेश सिंह (44) आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील अंकुर अशोक कुमार गोस्वामी (30) यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो मुंबई आणि दिल्ली हायकोर्टात वकिली करतो. फसवणुकीची सगळी योजना त्यानेच आखली होती, असे सांगण्यात येत आहे.
तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी ठाटाशा प्रायव्हेट लिमिटेड, श्री फिनटेक आणि रेक्ट्रीकर प्रायव्हेट लिमिटेड यांसारख्या अनेक कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांमार्फत सायबर फसवणुकीतील मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात आले. त्यासाठी म्यूल बँक खात्यांचा वापर झाला. रकमेची संघटित पद्धतीने लेयरिंग आणि मोठ्या प्रमाणावर मनी लाँडरिंग झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
काही आरोपींनी बँकिंग क्षेत्रात सुमारे 6 ते 7 वर्षे काम केले आहे. तसेच काही आरोपी 2024 मध्ये रेनेट टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत होते. या कंपनीविरुद्ध इंदूर येथे सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान पोलिसांना आंतरराज्यीय टोळीचा सुगावा लागला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची वेगवेगळी पथके दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशकडे रवाना झाली. वेगवेगळ्या राज्यांतून या पथकांनी सर्व सहा आरोपींना अटक केली. फसवणुकीच्या रकमेपैकी 4,20,61,162 रुपये परत मिळवण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल महस्के आणि सहायक पोलीस अधीक्षक शशांत एमएम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच, सायबर सेल आणि बडोदा पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपींनी विविध फायनान्शियल सर्व्हिसेस कंपन्या आणि पेमेंट गेटवेचा वापर करून फसवणुकीतील रक्कम पेआउटद्वारे दुसरीकडे वळवली, असेही उघड झाले आहे. त्यानंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढून हवालामार्फत पाठवण्यात आली. रकमेची लेयरिंग करून ती 1,000 पेक्षा जास्त बँक खात्यांमध्ये फिरवण्यात आली. नंतर विविध फिनटेक कंपन्यांमार्फत पेआउटसाठी या पैशांचा वापर झाला. वेगवेगळ्या खात्यांत रक्कम पाठवून लेयरिंग केल्यानंतर मुंबई आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी सोने खरेदी केल्याचेही समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.