गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात झोपेचा त्रास का होतो, कशी घ्याल काळजी
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात लघवी, अॅसिडिटी, पाठदुखी आणि बाळाच्या हालचालींमुळे झोप मोडते. त्यावर काय उपाय करता येतील ते पाहा.
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात बायकांना सगळ्यात जास्त त्रास होतो तो झोपेचा. दिवसभर अंगात थकवा असतो, पण रात्री मात्र डोळ्याला डोळा लागत नाही. पोट मोठं झालेलं असतं, सारखं लघवीला जावं लागतं आणि पाय दुखत राहतात. हा त्रास जवळपास सगळ्याच गरोदर महिलांना होतो.
रात्री झोप न लागण्यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे सारखी लघवीला जायची गरज. गरोदरपणात शरीरातले हार्मोन्स बदलतात आणि पोटातलं बाळ मोठं होत जातं. त्याचा दाब थेट लघवीच्या पिशवीवर येतो, त्यामुळे विशेषतः रात्री सारखं उठून जावं लागतं आणि झोप लागली की परत जाग येते.
दुसरं कारण म्हणजे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ. या काळात पोटावर दाब वाढतो, त्यामुळे जेवल्यावर अॅसिड वर येतं, छातीत जळजळ होते आणि अपचन होतं. रात्री जेवून लगेच झोपलं की हा त्रास आणखी वाढतो. तिसरं कारण पाठ आणि पायाचं दुखणं. वजन वाढल्यामुळे सगळा भार कंबर आणि पाठीवर येतो, त्यामुळे पाठ खूप दुखते. काही महिलांना रात्री पायात गोळे येतात आणि पाय सतत हलवावेसे वाटतात, त्यामुळे झोप मोडते.
चौथं कारण म्हणजे बाळाची हालचाल. पोटातलं बाळ काही वेळा रात्री जास्त ऍक्टिव्ह होतं, लाथा मारतं आणि हालचाल करतं, त्यामुळे आईला झोप लागणं किंवा टिकणं कठीण होतं. पाचवं कारण म्हणजे डोक्यात सतत चालणारे विचार. डिलिव्हरी कशी होईल, बाळ नीट असेल का, आपण चांगली आई होऊ का, असे विचार सतत मनात येत राहतात, त्यामुळे मन शांत होत नाही आणि शरीर थकलेलं असूनही झोप येत नाही.
चांगली झोप येण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात. मार्केटमध्ये गरोदर महिलांसाठी खास मोठ्या उशा मिळतात, त्या नसतील तर साध्या दोन-तीन उशा वापरता येतात, एक पोटाखाली, एक पाठीला आणि एक गुडघ्यांमध्ये ठेवली की कुशीवर झोपणं आरामदायी होतं. शेवटच्या महिन्यात डॉक्टर कुशीवर, शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचा सल्ला देतात. झोपेत चुकून पाठीवर झोप लागली तरी घाबरण्याचं कारण नाही, लक्षात आल्यावर हळूच परत कुशीवर वळावं.
रात्री झोपायच्या दोन तास आधी जेवण करावं आणि तेलकट, तिखट किंवा जड जेवण टाळावं, त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. संध्याकाळनंतर चहा-कॉफी टाळावी कारण त्यातल्या कॅफिनमुळे झोप उडते. रोज एकाच वेळी झोपणं आणि एकाच वेळी उठणं याची सवय शरीराला लावावी. झोपण्याआधी थोडं स्ट्रेचिंग करणं, दीर्घ श्वास घेणं-सोडणं, पुस्तक वाचणं किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणं फायद्याचं ठरतं. मोबाईल बघत झोपणं टाळावं.
काही महिलांना डॉक्टर झोपेसाठी मॅग्नेशियम देतात आणि त्याचा फायदाही होतो, पण स्वतःच्या मनाने कोणतीही गोळी घेऊ नये, आधी डॉक्टरांना विचारूनच घ्यावी. शेवटच्या महिन्यात झोप कमी होणं हे सर्वसाधारण मानलं जातं. पण रोजच झोप येत नसेल, दिवसभर त्याचा त्रास होत असेल, मोठ्याने घोरणं होत असेल, झोपेत श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा पाय खूप अस्वस्थ होत असतील, तर डॉक्टरांना नक्की भेटावं, याकडे दुर्लक्ष करू नये.