पितृपक्षात मराठवाड्याच्या पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर
पितृपक्षात श्रद्धाच्या दिवशी नैवेद्यासाठी खपली गव्हाची खीर बनवली जाते. दूध घातल्यावर खीर फुटण्याची भीती वाटत असेल, तर ही सोपी कृती पाहा.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची सुरुवात झाली की पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी हा काळ अतिशय पवित्र मानला जातो. पितृपक्षात श्रद्धाच्या दिवशी पूर्वजांच्या आवडीचे सात्त्विक आणि पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
या पदार्थांमध्ये तांदळाची खीर, गव्हाची खीर, वडे, मिक्स भाज्या, डाळभात असे अनेक पदार्थ असतात. महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये नैवेद्यासाठी खपली गव्हाची खीर बनवली जाते. गव्हाची खीर प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आवर्जून बनवली जाते. महाप्रसादात किंवा श्राद्धाच्या जेवणात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
पारंपरिक चवीची ही खीर शरीरासाठीही फायदेशीर आहे. गहू शिजवून त्यात दूध आणि गूळ घालून तयार केलेली खीर चवीला अतिशय सुंदर लागते. पण दूध टाकल्यानंतर खीर फुटून जाईल, अशी भीती अनेकदा मनात कायम निर्माण होते. म्हणूनच अख्ख्या गव्हाची ही खीर कशी बनवायची, त्याची कृती खाली दिली आहे.
साहित्य: गहू, गूळ, दूध, वेलची पावडर, काजू, खोबऱ्याचे तुकडे, तूप, खसखस, बडीशेप पावडर आणि सुंठ पावडर.
कृती: अख्ख्या गव्हाची खीर बनवण्यासाठी सर्वात आधी गहू पाण्याने स्वच्छ धुवा. तीन वेळा गहू धुतल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि गहू कॉटनच्या कपड्यावर सुकवण्यासाठी ठेवा. गहू कोरडे झाले की ते खलबत्त्यात घालून जाडसर कुटा. त्यामुळे त्यांच्यावरील साल निघून येते.
त्यानंतर कुकरच्या भांड्यात खपली गहू आणि गरजेनुसार पाणी घाला. गहू मऊ होईपर्यंत ५ ते ६ शिट्या काढा. त्यामुळे गहू व्यवस्थित मऊ होतात. गहू शिजल्यावर त्यात तुमच्या आवडीनुसार गूळ घालून नीट मिक्स करा.
आता कढईत तूप गरम करा आणि त्यात काजू व खोबऱ्याचे तुकडे लालसर होईपर्यंत भाजा. भाजल्यामुळे पदार्थाची चव मस्त लागते. भाजलेले हे साहित्य खिरीत ओता आणि मिक्स करा. मग त्यात सुंठ पावडर, बडीशेप पावडर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून पुन्हा मिक्स करा.
शेवटी खिरीला मंद आचेवर १० मिनिटं उकळी येऊ द्या. नंतर गॅस बंद करून खाण्यासाठी सर्व्ह करा. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने बनवलेली खपली गव्हाची खीर तयार होते.