पितृपक्ष: मृत्यूनंतर आत्म्याला भूक-तहान लागते का? गरुड पुराणातील तर्पण-श्राद्धाचे कारण
गणपती विसर्जनानंतर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या काळात केल्या जाणाऱ्या श्राद्ध, पिंडदान आणि तर्पणामागे नक्की काय कारण आहे, हे गरुड पुराणातील उल्लेखानुसार समजून घेऊया.
गणपतीची धामधूम आता संपली आहे आणि आजपासून, म्हणजे 27 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या काळात लोकांच्या मनात अनेक प्रश्न येतात, जसे की मृत्यूनंतर माणसाचं नक्की काय होतं, शरीर सोडल्यानंतरही भूक आणि तहान लागते का आणि श्राद्धाच्या वेळी अन्न-पाणी अर्पण करण्याची परंपरा का पाळली जाते. हिंदू धर्मात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गरुड पुराणात सापडतात. या पुराणात भगवान विष्णूंनी स्वतः त्यांचं वाहन गरुड याच्याशी बोलताना ही उत्तरं दिली आहेत असं मानलं जातं. मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण या विधींमागचं कारण नेमकं काय आहे, हे आता जाणून घेऊ.
सुरुवातीला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण या शब्दांचा अर्थ समजून घेऊ. श्राद्ध हा शब्द श्रद्धा या शब्दावरून आला आहे आणि त्याचा अर्थ पूर्वजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो. गरुड पुराणानुसार श्राद्धाच्या वेळी पूर्वजांना अर्पण केलेला नैवेद्य त्यांना वर्षभर सूक्ष्म स्वरुपात संतुष्ट करतो. यामुळे ते प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख, शांती, समृद्धी आणि संततीचा आशीर्वाद देतात, असा समज आहे.
पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठीच तर्पण केलं जातं. यामध्ये कुशा गवत, काळे तीळ आणि जव हातात घेऊन पाण्यासोबत पूर्वजांना अर्पण केलं जातं. गरुड पुराणानुसार असं अर्पण केलेलं पाणी पूर्वजांची तहान भागवतं असं मानलं जातं. तर मोक्षप्राप्तीसाठी किंवा आत्म्याच्या पुढील प्रवासाला मदत करण्यासाठी गया, हरिद्वार, प्रयागराज अशा तीर्थक्षेत्री पिंडदान केलं जातं. यामुळे दिवंगत आत्मा भौतिक बंधनातून आणि आसक्तीतून मुक्त होतो असा समज आहे. अनेक ठिकाणी असंही मानलं जातं की एकदा पिंडदान केल्यानंतर पूर्वजांसाठी किंवा मृत व्यक्तीसाठी पुन्हा श्राद्ध किंवा तर्पण करण्याची गरज उरत नाही.
आता मुख्य प्रश्नाकडे येऊ, म्हणजे मृत्यूनंतर खरंच भूक आणि तहान लागते का? गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा आत्मा शरीर सोडून यमलोकाच्या खडतर प्रवासाला निघतो, तेव्हा त्याला भूक आणि तहान लागते असं सांगितलं आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आत्म्याला उर्जेची गरज असते आणि ही उर्जा कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानातून मिळते असं मानलं जातं. म्हणूनच मृत्यूनंतर दहा दिवस पिंड अर्पण केल्यानं आत्म्याला यमलोकाचा लांबचा प्रवास पार करण्याची शक्ती मिळते, असं गरुड पुराणात सांगितलं आहे.
त्यामुळेच मृत्यूनंतर 13 दिवस हे विधी दररोज केले जातात. एवढंच नाही, तर गरुड पुराणानुसार 13 व्या दिवसानंतरही पितृलोकात गेलेल्या पूर्वजांना संतुष्ट करणं आवश्यक असतं असं मानलं जातं. त्यामुळेच पितृपक्षाच्या काळात दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी कुटुंबातील सदस्य तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात. गरुड पुराणानुसार हे विधी केवळ पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जात नाहीत, तर त्यांचं ऋण फेडण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठीही केले जातात, असं मानलं जातं.