पितृपक्ष 2026: 26 सप्टेंबरपासून सुरुवात, जाणून घ्या तिथीनिहाय श्राद्धाची संपूर्ण यादी
गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पितृपक्ष सुरू होतो. यंदा कोणत्या तारखेला कोणतं श्राद्ध आहे, याची सविस्तर माहिती.
गणेशोत्सव संपला की घरोघरी दुसरा एक महत्वाचा काळ सुरू होतो, तो म्हणजे पितृपक्ष. अनंत चतुर्दशीनंतर लगेचच्या दिवसापासून हा काळ चालू होतो आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा काळ पाळला जातो. या पंधरा दिवसांत पूर्वजांचं श्राद्ध केलं जातं, त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते कुटुंबाला आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे. श्राद्ध नेहमी दुपारच्या वेळी केलं जातं.
वैदिक पंचांगानुसार यंदाचा पितृपक्ष शनिवार, 26 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. या दिवशी पौर्णिमा असून पौर्णिमेच्या श्राद्धानेच पितृपक्षाला सुरुवात होईल. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस हा काळ चालतो आणि प्रत्येक तिथीनुसार त्या दिवशी श्राद्ध केलं जातं. ज्यांच्या पूर्वजांची नेमकी तिथी माहीत नसेल, त्यांचं श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केलं जातं.
यंदाच्या पितृपक्षातील तिथीनिहाय तारखा अशा आहेत. पहिला दिवस म्हणजे पौर्णिमा श्राद्ध 26 सप्टेंबर 2026, शनिवारी असेल, याच दिवशी पितृपक्ष सुरू होईल. त्यानंतर प्रतिपदा श्राद्ध 27 सप्टेंबर रविवारी, द्वितीया श्राद्ध 28 सप्टेंबर सोमवारी, तृतीया श्राद्ध 29 सप्टेंबर मंगळवारी आहे. 30 सप्टेंबर बुधवारी चतुर्थी आणि पंचमी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने त्याच दिवशी श्राद्ध करावं लागेल. षष्ठी श्राद्ध 1 ऑक्टोबर गुरुवारी, सप्तमी श्राद्ध 2 ऑक्टोबर शुक्रवारी, अष्टमी श्राद्ध 3 ऑक्टोबर शनिवारी येईल.
नवमी श्राद्ध 4 ऑक्टोबर रविवारी असून या दिवसाला अविवाहित व्यक्तींचं श्राद्ध असंही म्हटलं जातं. दशमी श्राद्ध 5 ऑक्टोबर सोमवारी, एकादशी श्राद्ध 6 ऑक्टोबर मंगळवारी आणि द्वादशी श्राद्ध 7 ऑक्टोबर बुधवारी आहे. त्याच दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरलाच मघा नक्षत्राचं श्राद्ध देखील येतं. त्रयोदशी श्राद्ध 8 ऑक्टोबर गुरुवारी, चतुर्दशी श्राद्ध 9 ऑक्टोबर शुक्रवारी असेल. पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या 10 ऑक्टोबर 2026, शनिवारी येईल. या दिवशी सगळ्या पूर्वजांचं श्राद्ध केलं जातं आणि ज्यांची तिथी नेमकी माहीत नाही, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो.
आई-वडील आणि आजी-आजोबांमुळेच आपण आज या जगात आहोत, त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट उपसले, त्यांच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे श्राद्ध केलं जातं, असं सांगितलं जातं. पितृपक्षात केलेलं दान आणि पिंडदान पूर्वजांपर्यंत पोहोचतं, अशी मान्यता आहे.
धर्म, ज्योतिष यासंबंधी ही माहिती केवळ वाचकांसाठी दिली असून, कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.