वडिलांच्या शेवटच्या इच्छेमुळे नृत्यक्षेत्रात आलेल्या कृती महेशला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार विजेती नृत्यदिग्दर्शिका कृती महेश हिने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपला संघर्ष, यश आणि वडिलांच्या आठवणी सांगितल्या.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयुष्यात आपण ठरवलेले स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. कधीकधी नियती वेगळ्याच वाटेवर घेऊन जाते आणि तीच वाट यशाची नवी ओळख बनते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती नृत्यदिग्दर्शिका कृती महेश हिचा प्रवासही असाच आहे. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या 'नवदुर्गा' या विशेष पॉडकास्टमध्ये तिने आपला संघर्ष, यश, वडिलांच्या आठवणी, बॉलिवूडमधील अनुभव आणि महिलांसाठी प्रेरणादायी संदेश याबद्दल मनमोकळे सांगितले.
कृतीने लंडनमध्ये जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात करिअर करायचा तिचा विचार होता. मात्र वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे तिला भारतात परतावे लागले. भारतात आल्यावर ती वडिलांसोबत वेळ घालवत होती. त्याच काळात 'डान्स इंडिया डान्स'चा पहिला सीझन सुरू होता आणि कृती व तिचे वडील तो कार्यक्रम एकत्र पाहायचे. कार्यक्रम पाहताना वडिलांनी तिला नृत्यक्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला. एवढे शिक्षण घेतल्यानंतर अचानक नृत्याकडे वळणे तिला योग्य वाटत नव्हते. लहानपणापासून नृत्याची आवड होती, पण व्यावसायिक करिअर म्हणून तिने त्याकडे कधी पाहिले नव्हते. कुटुंबातही या क्षेत्रातले कोणी नव्हते, त्यामुळे पुढे काय करायचे हे तिला कळत नव्हते.
वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने 'डान्स इंडिया डान्स'च्या दुसऱ्या सीझनची ऑडिशन द्यायचे ठरवले. निवड झाली नाही तरी आपल्याकडे शिक्षण आहे, दुसरी नोकरी करता येईल, असा विचार तिने केला. पण पहिली, दुसरी आणि तिसरी अशा फेऱ्या पार करत तिची निवड झाली आणि आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले.
निवडीनंतर कृती प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस यांच्या 'टेरेन्स की टोली' या टीममध्ये गेली. तिथे अनेक प्रतिभावान नर्तकांसोबत काम करायला मिळाले आणि नृत्याबद्दलचा तिचा आत्मविश्वास वाढला. तिने लहानपणापासून शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते, सोबत पाश्चात्त्य नृत्यशैली आणि काही प्रमाणात जिम्नॅस्टिक्सचाही सराव केला होता. रिॲलिटी शोनंतर पुढची एक-दोन वर्षे नृत्याला पूर्ण वेळ द्यायचे तिने ठरवले. छंद म्हणून नाही, तर पूर्ण मेहनत, लक्ष आणि समर्पण देऊन.
पुढे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्या टीममधून तिला फोन आला आणि एका प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली. असे काम आधी केले नव्हते, तरीही तिने ती संधी स्वीकारली. नवीन गोष्टी शिकायच्या आणि मिळेल त्या प्रत्येक संधीचा उपयोग करायचा, असा तिचा दृष्टिकोन होता.
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'बलम पिचकारी' हे गाणे तिच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा ठरले. प्रेक्षक म्हणून आपण गाणे पाहून ते चांगले-वाईट म्हणतो, पण एक गाणे उभे करायला किती मेहनत लागते हे सेटवर गेल्यावर समजले, असे ती म्हणाली. तिथे मोठ्या संख्येने नर्तक, सहाय्यक दिग्दर्शक, सहाय्यक नृत्यदिग्दर्शक, वेशभूषाकार आणि तांत्रिक कर्मचारी काम करत होते. तीन-चार मिनिटांच्या गाण्यासाठी अनेकांचा वेळ, मेहनत आणि प्रतिभा खर्च होते, हे पाहून ती प्रभावित झाली. त्यातूनच चित्रपटसृष्टीतील नृत्यदिग्दर्शनाची तिला अधिक आवड निर्माण झाली.
त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' मध्ये कृतीला एका टीमची कॅप्टन म्हणून काम करायला मिळाले. पाच-सहा वर्षांच्या मुलांमधली नृत्याची प्रतिभा पाहून ती थक्क झाली. या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत लागायची आणि कधीकधी सलग १६ तास काम करावे लागायचे, असे तिने सांगितले. तरीही लहान मुलांसोबतचा अनुभव अत्यंत सुंदर आणि समाधान देणारा होता, असे ती म्हणाली.
एका कार्यक्रमात काम करत असताना तिला प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयातून भेटीसाठी फोन आला. तेव्हा आयुष्यातले मोठे यश मिळाल्यासारखे वाटले, असे कृतीने सांगितले. भन्साळी यांनी तिचे काम पाहिले होते आणि ते त्यांना आवडले होते. एका नवीन प्रोजेक्टसाठी नृत्यदिग्दर्शन करण्याबाबत त्यांनी तिच्याशी चर्चा केली. मात्र त्या वेळी सुरू असलेल्या टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या वेळापत्रकामुळे तिला त्या प्रकल्पात काम करता आले नाही.
ही संधी हुकल्यामुळे कृती प्रचंड निराश झाली. इतकी मोठी संधी पुन्हा मिळेल का, याची तिला चिंता होती. त्यानंतर तीन ते चार महिने अक्षरशः रडत राहिल्याचे तिने सांगितले. तरीही तिने काम थांबवले नाही. चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम करत तिचा प्रवास सुरू राहिला.
काही काळाने तिला 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली. रिहर्सलदरम्यान भन्साळी येणार असल्याचे तिला समजले. पहिल्या भेटीला जवळपास दोन वर्षे उलटली होती, त्यामुळे ते आपल्याला ओळखतील का, असा प्रश्न तिच्या मनात होता. पण भन्साळी यांनी तिला पाहताच ओळखले. दोन वर्षांनंतरही त्यांना आपली आठवण आहे, हे पाहून ती चकित झाली. भन्साळी यांची स्मरणशक्ती आणि कामातील बारकाव्यांकडे लक्ष देण्याची क्षमता विलक्षण असल्याचे तिने सांगितले.
'बाजीराव मस्तानी' मधील 'पिंगा' आणि 'दीवानी मस्तानी' या गाण्यांवरचे काम तिच्यासाठी अविस्मरणीय ठरले. 'दीवानी मस्तानी' च्या नृत्यदिग्दर्शनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्या वेळी भन्साळी यांनी तिच्या योगदानाचे कौतुक केल्याची आठवण तिने सांगितली. इतक्या मोठ्या दिग्दर्शकाने आपल्या कामाची दखल घेणे आणि सर्वांसमोर कौतुक करणे, हे त्यांचे मोठेपण असल्याचे कृती म्हणाली.
'बाजीराव मस्तानी' नंतर काही काळातच भन्साळी यांच्या कार्यालयातून पुन्हा फोन आला. नवीन चित्रपट आणि त्यातील नृत्यदिग्दर्शनाबाबत चर्चा झाली. पारंपरिक लोकनृत्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नृत्यरचनांवर काम करण्याचा अनुभव तिने सांगितला. राजस्थानी घूमर नृत्याच्या सादरीकरणासाठी घेतलेल्या मेहनतीचाही उल्लेख केला. नृत्यदिग्दर्शन म्हणजे फक्त स्टेप्स बसवणे नाही, तर त्या नृत्यशैलीमागची संस्कृती, परंपरा आणि इतिहास समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे तिने सांगितले.
स्वतःच्या 'काली' या कंपनीच्या नावामागचा विचारही तिने सांगितला. काली देवीचे रूप अनेकदा रौद्र स्वरूपात पाहिले जाते, पण तिच्याबद्दल अधिक वाचल्यावर त्या रूपामागची सृजनशक्ती आणि व्यापक अर्थ समजला, असे कृतीने सांगितले. त्यातूनच तिने कंपनीसाठी 'काली' हे नाव निवडले.
नवरात्रोत्सवानिमित्त महिलांना संदेश देताना कृतीने स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला सांगितले. आयुष्यात सतत तडजोड करत राहू नका, कोणत्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो हे ओळखा आणि त्यासाठी प्रयत्न करा, असे ती म्हणाली. "तुम्ही स्वतः आनंदी असाल, तरच दुसऱ्यांनाही आनंदी ठेवू शकता. त्यामुळे ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो, ती गोष्ट नक्की करा," असा संदेश तिने दिला.