फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
शिक्षकांची कमतरता, वर्गातली गर्दी आणि विद्यापीठ प्रवेशाचा ताण या मुद्द्यांवरून फ्रान्समधले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
फ्रान्समध्ये शिक्षण व्यवस्थेतल्या अडचणींविरोधात विद्यार्थ्यांची नाराजी आता थेट रस्त्यावर आली आहे. देशातल्या अनेक उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून शाळा बंद ठेवून निदर्शने केली जात आहेत. शिक्षकांची कमतरता वाढली आहे, वर्गातली गर्दी वाढते आहे, शाळांमधल्या सोयी अपुऱ्या आहेत आणि शिक्षण व्यवस्थेवरचा दबाव वाढतो आहे. या सगळ्या मुद्द्यांमुळे विद्यार्थी संतापले आहेत.
हे आंदोलन वाढत वाढत आता फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपर्यंत पोहोचले आहे. आयफेल टॉवरच्या खालच्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी एक चारचाकी वाहन पेटवले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्रान्समधली मुले आता सरकारचे ऐकत नाहीत आणि त्याला जुमानतही नाहीत, असे चित्र यातून दिसते आहे.
आंदोलनातला एक प्रमुख मुद्दा म्हणजे शिक्षकांची कमतरता. अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे तास रद्द होतात, किंवा त्यांचे नेहमीचे शिक्षण विस्कळीत होते. त्याबरोबरच काही शाळांमध्ये एका वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नाही, असा दावा आंदोलन करणारे विद्यार्थी करत आहेत. शाळांच्या इमारती आणि मूलभूत सुविधा याबद्दलही अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यापीठ प्रवेशाच्या प्रक्रियेबद्दलही फ्रान्समधल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी Parcoursup ही प्रणाली वापरली जाते. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येतो, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. प्रवेशाच्या संधी, शिक्षणातली असमानता आणि पुढच्या करिअरबद्दलची असुरक्षितता यामुळे विद्यार्थ्यांचा ताण वाढतो आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळांच्या गेटवर निदर्शने केली आणि काही शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्नही झाला. काही भागांत पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला, मात्र त्यात कोणालाही इजा झाली नाही. आगी लावण्याच्या आणि तोडफोडीच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इतरही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांना त्यात मध्ये पडावे लागले आहे. तरीही सध्या तरी विद्यार्थ्यांना अटक झाल्याचे किंवा त्यांच्यावर लाठीचार्ज झाल्याचे वृत्त आलेले नाही.
दरम्यान, फ्रान्समधल्या सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. आता आंदोलन शांत करण्याबरोबरच शिक्षण व्यवस्थेतल्या या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आव्हान सरकारसमोर उभे राहिले आहे.