बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:48 IST

कॉकपिटमधील हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीवर सौदीत तातडीची शस्त्रक्रिया

फ्लायदुबईच्या विमानात सह-वैमानिकाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीला गंभीर फ्रॅक्चर झाले; त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

कॉकपिटमधील हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कवटीवर सौदीत तातडीची शस्त्रक्रिया छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात ३० सप्टेंबर रोजी थरारक प्रकार घडला. विमान ३५,००० फूट उंचीवर असताना ओमानचा सह-वैमानिक हमाम अल-हमामी याने भारतीय मूळ असलेले मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आणि दृष्टी धूसर झालेली असतानाही कॅप्टन स्मित यांनी हार मानली नाही. त्यांनी कॉकपिटचे ऑटोमॅटिक लॉक असलेले दार आतून उघडले. या एका निर्णयामुळे विमानातील १८० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले.

सह-वैमानिकाने कॉकपिटमधील आपत्कालीन कुऱ्हाडीने (Crash Axe) कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले होते. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या कवटीला अत्यंत गंभीर स्वरूपाचे 'डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर' (Depressed Skull Fracture) झाले. या प्रकारात डोक्यावरील जोरदार आघातामुळे कवटीचे हाड मोडते आणि त्याचा एक तुकडा मेंदूच्या आत ढकलला जातो. हे हाड मेंदूच्या ऊतींवर (Brain Tissues) दाब आणते, त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव, मेंदूला इजा आणि जीवितहानीचा मोठा धोका असतो.

विमानाचे सौदी अरेबियातील तबूक येथील प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर कॅप्टन स्मित यांना लगेच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सौदीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या कवटीवर आपत्कालीन शस्त्रक्रिया (Skull Reconstruction Surgery) करून मेंदूवरील दाब काढला. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना पुढील विशेष उपचारांसाठी संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबुधाबी येथील लष्करी रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

कॉकपिटमध्ये झटापट सुरू असताना सह-वैमानिकाने विमानाचा ताबा घेऊन ते वेगाने खाली आणण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत बोईंग ७३७ मॅक्स हे विमान ३४,००० फुटांवरून थेट १६,००० फुटांपर्यंत खाली आले. या हालचालीमुळे रडारवर इमर्जन्सी सिग्नल दिसू लागले. ९/११ सारखा दहशतवादी हल्ला किंवा विमान हायजॅक करून तेल अवीव शहरावर किंवा बेन गुरियन विमानतळावर आदळवण्याचा हा कट असावा, असा संशय इस्रायली यंत्रणांना आला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इस्रायलने आपली नागरी हवाई हद्द तात्काळ बंद केली. सुरक्षेच्या कारणास्तव विमान हवेतच पाडण्यासाठी (Shoot Down) लढाऊ विमाने (Fighter Jets) कॉकपिटच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्याच वेळी सौदी अरेबियानेही आपली हवाई हद्द सुरक्षित ठेवण्यासाठी फायटर जेट्स हवेत तैनात ठेवले होते. इस्रायली फायटर पायलट्सनी विमानाच्या खिडकीतून आत काय चालले आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला.

कॅप्टन स्मित यांनी कॉकपिटचे दार उघडताच विमानातील ऑफ-ड्यूटी वैमानिक आणि काही इस्रायली प्रवाशांनी, ज्यात एक डॉक्टर आणि एक प्लंबर होते, कॉकपिटमध्ये धाव घेतली. त्यांनी हमामी याला धरून ठेवले आणि बांधून ठेवले. ऑफ-ड्यूटी पायलट आणि प्रवाशांनी विमानाचे नियंत्रण परत मिळवून ते हवेत स्थिर केले.

विमान सौदी अरेबियात उतरताच सौदी सुरक्षा दलांनी सह-वैमानिकाला तत्काळ अटक केली. सुरुवातीच्या तपासात हमामी याने विमान तेल अवीववर आदळवून आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. कॅप्टन स्मित मच्छर यांच्या असामान्य धैर्यामुळे १८० प्रवाशांचे प्राण वाचले असून जगभरातून त्यांच्या शौर्याचे कौतुक केले जात आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ