विमानात जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांना सलमान खानचा सलाम
फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील घटनेनंतर कॅप्टन स्मित मच्छर यांचं सलमान खानने कौतुक केलं, तर जावेद अख्तर यांनी महावीर चक्राची मागणी केली.
३० सप्टेंबरला आकाशात घडलेला प्रकार ऐकून अंगावर काटा येतो. फ्लायदुबईचं FZ1073 हे विमान दुबईहून तेल अवीवला निघालं होतं. त्यात १८० पेक्षा जास्त प्रवासी होते. सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं, पण कॉकपिटमध्ये असं काही घडलं की या सगळ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला. अशा वेळी एका मराठी कॅप्टन स्मित मच्छर यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक आता सगळा देश करतोय.
मिळालेल्या माहितीनुसार विमान हवेत असताना कॉकपिटमध्ये दोन पायलटमध्ये वाद झाला. तो इतका वाढला की को-पायलटने थेट कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात कॅप्टन स्मित गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर विमान अचानक वेगाने खाली यायला लागलं आणि विमानात घबराट पसरली. प्रवाशांना वाटलं की आता काही खरं नाही. पण जखमी असतानाही कॅप्टन स्मित यांनी हार मानली नाही. कसंतरी स्वतःला सावरून त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. बाहेरच्या क्रूने मदत केली आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली गेली. त्यानंतर विमान सौदी अरेबियामधील ताबुक येथे सुरक्षित उतरवण्यात आलं. कॅप्टन स्मित यांनी धाडस दाखवलं नसतं तर मोठा अपघात झाला असता, असं म्हटलं जातंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. याआधी रवीना टंडन, रवि किशन, कंगना रनौत, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि सोनम कपूर यांनी कॅप्टन स्मित यांचं कौतुक केलं होतं. आता सलमान खानने रात्री उशिरा X वर पोस्ट करून त्यांना सलाम केला. त्यात त्याने लिहिलं, "कमाल केलंत पायलट साहेब, आम्ही सगळे तुम्हाला सलाम करतो. तुमच्यासोबत विमान प्रवास करणं ही आनंदाची गोष्ट असेल. वेल डन ब्रो." सलमानची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे फॅन्सही कॅप्टन स्मित यांचं कौतुक करत असून कमेंटमध्ये अनेक जण त्यांना रिअल हिरो म्हणत आहेत.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी तर एक पाऊल पुढे जाऊन मोठी मागणी केली. त्यांनी X वर पोस्ट करून लिहिलं, "स्मित मच्छर यांना सलाम! त्यांना देशाच्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांपैकी एक असलेल्या महावीर चक्रासाठी पात्र मानण्यात यावं, यात कोणतीही शंका नाही." जावेद अख्तर यांच्या या मागणीला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
सोशल मीडियावर लोक म्हणत आहेत की कॅप्टन स्मित यांनी फक्त विमान वाचवलं नाही, तर १८० कुटुंबांचे जीव वाचवले. स्वतः जखमी असताना आणि विमान खाली येत असताना शांत डोक्याने निर्णय घेऊन ते सुरक्षित उतरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता सगळा देश कॅप्टन स्मित मच्छर लवकर बरे होण्याची वाट बघतोय.