वर्धा पोलीस: बनावट ई-चलान मेसेज आणि APK फाईलपासून सावध राहा, बँक खाते रिकामे होण्याचा धोका
वाहन चालकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर फसवणुकीबद्दल वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सायबर गुन्हेगार आता नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. विशेषतः वाहन चालकांना लक्ष्य करून 'बनावट ई-चलान' आणि संशयास्पद एपीके (APK) फाईल्सच्या मदतीने बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
फसवणूक कशी केली जाते, याची कार्यपद्धतीही पोलिसांनी सांगितली आहे. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मोबाईलवर एसएमएस, व्हाट्सऐप किंवा ईमेलद्वारे वाहतूक नियमभंगाचे खोटे संदेश पाठवतात. वाहन चालकाने ओव्हरस्पीडिंग केले, हेल्मेट न घालता गाडी चालवली किंवा सिग्नल तोडला, असे आरोप त्या संदेशात केलेले असतात आणि दंडाची रक्कम भरायला सांगितली जाते. त्याच संदेशासोबत एक बनावट लिंक, क्यूआर कोड किंवा एपीके फाईल जोडलेली असते.
घाईत किंवा भीतीपोटी एखाद्याने त्या लिंकवर क्लिक करून अनोळखी अॅप इन्स्टॉल केले किंवा ऑनलाईन पेमेंटचा प्रयत्न केला, की त्याच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरांकडे जातो. त्यानंतर बँक तपशील, युपीआय पिन, ओटीपी आणि गोपनीय वैयक्तिक माहिती चोरीला जाते आणि बँक खात्यातील सर्व रक्कम परस्पर काढून घेतली जाते.
नागरिकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, यासंबंधी पोलिसांनी चार उपाय सुचवले आहेत. पहिला उपाय म्हणजे अधिकृत पडताळणी करणे. वाहतूक चलनाची कोणतीही माहिती फक्त शासकीय व अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अधिकृत मोबाईल अॅपवरूनच खात्री करून घ्यावी आणि कोणत्याही अनधिकृत लिंकवर विश्वास ठेवू नये.
दुसरा उपाय म्हणजे अज्ञात स्रोताकडून किंवा अनोळखी क्रमांकावरून आलेली एपीके फाईल किंवा अॅप मोबाईलमध्ये कधीही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये. शासकीय विभाग कधीही थेट एपीके फाईल पाठवून दंड भरायला सांगत नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तिसरा उपाय म्हणजे युपीआय पिन, पासवर्ड, ओटीपी किंवा कोणतेही बँक तपशील फोनवर वा मेसेजवर कोणाशीही शेअर करू नयेत. चौथा उपाय म्हणजे कोणत्याही संदेशाबद्दल शंका आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक शाखा कार्यालयात संपर्क साधून सत्यता तपासावी.
फसवणूक झालीच, तर तातडीने काय करायचे हेही पोलिसांनी सांगितले आहे. आलेला मेसेज, स्क्रीनशॉट आणि बँक व्यवहाराचे तपशील सुरक्षित ठेवावेत. संबंधित बँकेच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी तत्काळ संपर्क साधून बँक खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ब्लॉक करून घ्यावे. कोणताही विलंब न करता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन लगेच लेखी तक्रार दाखल करावी.
पोलिसांनी असेही म्हटले आहे: "वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा यंत्रणेने पाठवलेल्या संशयास्पद ई-चलान लिंक किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये. सायबर गुन्हेगारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सतर्क राहा आणि नेहमी अधिकृत शासकीय स्रोतांचाच वापर करा."