शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस साजरी करणार दिवाळी

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस साजरी करणार दिवाळी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका शेतकरी कुटुंबाच्या घरी मुक्काम करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले आणि बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे सगळीकडे दिवाळीचा उत्साह, घराघरांत रोषणाई आणि आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या घरातील दिवाळी चिंतेच्या सावटाखाली आहे.

अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचावा, या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा या गावात पोहोचणार आहेत. तिथे एका शेतकरी कुटुंबाच्या घरी ते रात्रीचा मुक्काम करतील आणि दुसऱ्या दिवशी त्याच कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतील. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री थेट शेतकऱ्याच्या घरी मुक्काम करून त्याच्यासोबत सण साजरा करणार असल्याचा उल्लेख या उपक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करतो.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गावात तयारी सुरू झाली आहे. मात्र या भेटीचे महत्त्व केवळ मुख्यमंत्र्यांचा मुक्काम एवढेच नाही. राज्याचा प्रमुख थेट शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याचे दुःख आणि अडचणी समजून घेणार आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

पावसाअभावी झालेल्या नुकसानीमुळे दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर उभा आहे. सरकारकडून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सण साजरा करण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी यापूर्वी केले होते. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी त्यांची भूमिका होती. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी या आवाहनाची सुरुवात कृतीतून केली आहे.

दिवाळीच्या दिव्यांनी उजळणाऱ्या शहरांपासून दूर, दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात यंदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवाळीचा दिवा उजळणार आहे. शेतकऱ्याच्या ताटातील अन्न, घरातील परिस्थिती आणि मनातील वेदना समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्याच घरात मुक्काम करणार आहेत. या भेटीतून शेतकऱ्यांना केवळ भावनिक आधार मिळतो की त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णयही होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ