स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात पुढे; तरुणांच्या संशोधनावर फडणवीसांचा भरवसा
'द गव्हर्नन्स चॅलेंज' स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांना मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
मुंबई : वित्त, उद्योग, उद्योजकता आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला नेतृत्व देणारा महाराष्ट्र स्टार्टअपची संख्या आणि त्यांची अंमलबजावणी या दोन्ही बाबतींत भारताची स्टार्टअप राजधानी ठरला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हे सामर्थ्य आणि तरुणांचे संशोधन यामुळे महाराष्ट्र भविष्यात जगाचे इनोव्हेशन हब नक्की बनेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
एनसीपीए येथील जमशेद भाभा सभागृहात 'द गव्हर्नन्स चॅलेंज' स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीतील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. ही स्पर्धा गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्था यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आली होती.
फडणवीस म्हणाले, ही केवळ स्पर्धा नाही. महाराष्ट्रासह देशाच्या पुढच्या काळातील प्रशासकीय रचनेला आकार देणारी प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा हा उपक्रम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, डिजिटल प्रशासन, शहरीकरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल आणि नवोन्मेष परिसंस्था या क्षेत्रांत नव्या पिढीचा दृष्टिकोन प्रशासनात आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, अमरावतीसह राज्याच्या कोणत्याही भागातील युवा संशोधकांना मार्गदर्शक, तंत्रज्ञान, इन्क्युबेशन आणि बाजारपेठ मिळाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वर्गखोलीतील कल्पनेपासून जागतिक कंपनीपर्यंत आणि कल्पनेपासून प्रत्यक्ष परिणाम व जागतिक विस्तारापर्यंतची संपूर्ण नवोन्मेष साखळी महाराष्ट्रात उभी केली जात आहे. हॅकेथॉनचा शेवट केवळ प्रमाणपत्र देऊन न होता, त्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
देशातील एकूण स्टार्टअपपैकी १८ टक्के स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत आणि ही संख्या देशात सर्वाधिक आहे. नव्या कल्पनांचे संशोधन, परीक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्टार्टअप, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील पहिले समर्पित स्टार्टअप इन्क्युबेटर म्हणून 'एम-हब' विकसित केले जात आहे. नवी मुंबईत ३०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी 'इनोव्हेशन सिटी' उभारली जाणार आहे. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२६ अंतर्गत दोन लाख युवक आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले जाणार असून एआय आधारित संशोधनाला चालना देण्यासाठी राज्यात एआय इन्क्युबेटर्स स्थापन केले जातील. शासकीय डेटा युवा नवोन्मेषकांसाठी नव्या संशोधनाचा आधार ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील ८७ विद्यापीठे, सुमारे पाच हजार ५०० महाविद्यालये आणि ४५ लाखांहून अधिक विद्यार्थी उद्याचा महाराष्ट्र घडविण्याची क्षमता बाळगतात, असे फडणवीस यांनी सांगितले. नव्या कल्पना घेऊन पुढे येणाऱ्या युवकांना शासन सतत प्रोत्साहन देईल. २०१५ पासून मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमाच्या सात तुकड्यांतील विविध क्षेत्रांतील युवा व्यावसायिकांना वरिष्ठ प्रशासनासोबत थेट काम करण्याची संधी मिळाली आहे.
महाराष्ट्राने २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी नवोन्मेष ही प्रमुख प्रेरक शक्ती ठरणार आहे. जगासाठी महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती आणि संरचना करणे हे राज्याचे ध्येय आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहा संघांनी विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. आयआयएम मुंबईच्या शुभम पाटील, वरुण दामले व संहिता म्हात्रे यांनी आरोग्य, जे. जे. मेहता स्कूल ऑफ बिझनेस मुंबईच्या आयुष मेहता व निलेश यांनी कृषी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या आरीशा बटाला, ऋतिक जैन व तरण पुरी यांनी शिक्षण, बीआयटीएस स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या श्रेष्ठा भट, तरुण शेखावत व अपूर्वा शर्मा यांनी वित्त, आयआयएम रांचीच्या हिमांशू पाटील, मजहर शेख व मोहक चंदक यांनी 'इन्व्हेशन इन गव्हर्नन्स' आणि मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल व गुरुप्रसाद शेट्टी यांनी शहरी विकास या विषयावर सादरीकरण केले.
पाच लाख रुपयांचे प्रथम रोख पारितोषिक शहर विकासावर सादरीकरण करणाऱ्या मास्टर्स युनियन स्कूल ऑफ बिझनेसच्या अंकिता शिर्के, सिद्धार्थ राजपाल व गुरुप्रसाद शेट्टी यांच्या चमूने मिळविले. तीन लाख रुपयांचे द्वितीय रोख पारितोषिक शिक्षण विषयावर सादरीकरण करणाऱ्या स्कूल ऑफ बिझनेसच्या आशीरा बाटला, तरण पुरी व ऋतिक जैन यांच्या चमूला मिळाले. एक लाख रुपयांचे तृतीय रोख पारितोषिक आरोग्य विषयावर सादरीकरण करणाऱ्या आयआयएम मुंबईच्या शुभम पाटील, वरूण दामले आणि संहिता म्हात्रे यांच्या चमूने पटकावले.