पेंच जलाशयात १ ऑक्टोबरपासून 'सोलर बोट सफारी', आवाज आणि प्रदूषण कमी ठेवून जंगलाचा अनुभव
पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या जलाशयात १ ऑक्टोबरपासून सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीतून सफारी सुरू होत आहे.
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या जलाशयात पर्यटकांना आता सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीतून सफारीचा नवा अनुभव घेता येणार आहे. 'सोलर बोट सफारी' १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यासाठी केरळमधून दोन बोटी आणण्यात आल्या असून, त्या सज्ज करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बोटीची क्षमता २४ प्रवाशांची आहे. या बोटींमुळे आवाज आणि प्रदूषण कमी ठेवून जलाशयातील निसर्ग, पक्षी आणि वन्यजीव न्याहाळता येणार आहेत.
कोलितमारा येथून सफारीचे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिला मार्ग कोलितमारा ते नांदपूर-नगारागोटा असा आहे. त्याचे अंतर सुमारे ८ ते १० किलोमीटर असून, या सफारीसाठी सुमारे दीड तास लागणार आहे. नांदपूर कुटी येथे पर्यटकांसाठी विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मार्गासाठी सोमवार ते शुक्रवार ४०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शनिवार आणि रविवारी हेच शुल्क ५०० रुपये असेल. दिवसभरात पाच फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या सकाळी ६ ते ८, ८.३० ते १०.३०, ११ ते १, १.३० ते ३.३० आणि ४ ते ६ अशा आहेत.
या सफारीत नांदपूर परिसरातील वाकाटककालीन ऐतिहासिक वारसा आणि कुंदरा भीमसेन देवस्थान पाहता येणार आहे. याशिवाय पक्षी निरीक्षणासोबतच जलाशय परिसरात मगरींचे दर्शन होण्याची शक्यता आहे. पाणवठ्यावर येणारे वाघ, गवे, चितळ, सांबर, भेकर आणि मोरही पर्यटकांना पाहता येणार आहेत.
दुसरा मार्ग कोलितमारा-कुंदरा भीमसेन-परत असा आहे. या मार्गाची लांबी सुमारे २५ ते २८ किलोमीटर असून, या सफारीचा कालावधी तीन तासांचा राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार ८०० रुपये, तर शनिवार-रविवार १,१०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या मार्गावर सकाळी ६ ते ९, १० ते १ आणि दुपारी २ ते ५ अशा तीन फेऱ्या असतील.
सफारीच्या बुकिंगसाठी दोन सोयी आहेत. ऑनलाइन बुकिंग पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल. ऑफलाइन बुकिंगची सुविधा कोलितमारा येथील मानको टुरिझम कॉम्प्लेक्सच्या बुकिंग काउंटरवर उपलब्ध राहणार आहे.