PCOS असलेल्या महिलांना मधुमेहाचा धोका जास्त, इन्सुलिन रेझिस्टन्स हा दुवा
PCOS हा फक्त मासिक पाळी किंवा प्रजननक्षमतेशी संबंधित आजार नसून त्याचा शरीराच्या साखर हाताळण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, त्यामुळे प्रीडायबेटीस आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS हा आजार बहुतेकदा अनियमित मासिक पाळी, मुरूम, चेहऱ्यावर जास्त केस येणे, वजन वाढणे आणि गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींशी जोडला जातो. पण हा फक्त प्रजनन किंवा प्रजननक्षमतेपुरता मर्यादित प्रश्न नाही. याचा परिणाम शरीराच्या चयापचयावरही होतो, आणि त्यामुळे शरीराची साखर व्यवस्थापित करण्याची क्षमता बिघडून टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. अलीकडेच PCOS चे नाव बदलून Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome म्हणजे PMOS असे करण्यात आले आहे.
ज्या महिलांना PCOS आहे, त्यांच्यात PCOS नसलेल्या महिलांच्या तुलनेत प्रीडायबेटीस आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. अलीकडील अभ्यासांनुसार इन्सुलिन रेझिस्टन्स हे PCOS मधलं एक महत्त्वाचं चयापचयविषयक वैशिष्ट्य आहे, आणि बॉडी मास इंडेक्स म्हणजे BMI कितीही असो, PCOS असलेल्या 70 टक्के महिलांपर्यंत याचा परिणाम होऊ शकतो.
PCOS आणि मधुमेह यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे हाच इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन हे एक हार्मोन आहे जे रक्तातली साखर पेशींपर्यंत पोहोचवायला मदत करतं, तिथे तिचा वापर ऊर्जेसाठी होतो. PCOS असलेल्या अनेक महिलांच्या पेशी इन्सुलिनला अपेक्षित पद्धतीने प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. कालांतराने ही यंत्रणा कमी कार्यक्षम होते, साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि सुरुवातीला प्रीडायबेटीस, तर काही महिलांमध्ये पुढे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढणं आणि हार्मोन्समधला असमतोल यासारख्या PCOS मधल्या इतर लक्षणांनाही हातभार लागू शकतो, आणि यातून चेहऱ्यावर जास्त केस येणं व मासिक पाळी अनियमित होणं असं एक चक्र तयार होऊ शकतं.
मात्र PCOS असलेल्या प्रत्येक महिलेला मधुमेह होतोच असं नाही. PCOS कडे मधुमेहासाठीचा एक जोखीम घटक म्हणून पाहायला हवं. काही महिलांमध्ये साखरेची पातळी कधीच असामान्य होत नाही, तर काहींमध्ये तुलनेने कमी वयातच प्रीडायबेटीस किंवा मधुमेह होऊ शकतो. यात भर घालणारे इतर घटक म्हणजे जास्त वजन, विशेषतः पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी, टाइप 2 मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, बैठी लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हाय ब्लड प्रेशर. महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना PCOS आहे पण वजन जास्त नाही, त्यांनीही आपल्याला धोका नाही असं गृहीत धरू नये, कारण PCOS आणि साखरेतल्या बदलांचा संबंध वजनापासून स्वतंत्रपणेही असू शकतो.
मधुमेह हळूहळू वाढू शकतो आणि सुरुवातीला त्याची स्पष्ट लक्षणं दिसतीलच असं नाही, त्यामुळे PCOS असलेल्या महिलांसाठी नियमित तपासणी महत्त्वाची आहे. PCOS संदर्भातील आंतरराष्ट्रीय पुराव्यांवर आधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PCOS चं निदान झाल्यावर साखरेची स्थिती तपासली जावी आणि त्यानंतर महिलेच्या वैयक्तिक जोखीम घटकांनुसार साधारण दर 1 ते 3 वर्षांनी पुन्हा तपासणी करता येते. यासाठी Oral Glucose Tolerance Test म्हणजे OGTT ही सर्वात अचूक पद्धत मानली जाते, तर फास्टिंग आणि जेवणानंतरची ब्लड शुगर तसंच HbA1c या तपासण्याही उपयुक्त ठरतात. कोणती तपासणी करायची हे महिलेच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार उपचार करणारे डॉक्टर ठरवतात.
नियमित व्यायामामुळे शरीराला इन्सुलिनचा वापर जास्त कार्यक्षमतेने करता येतो आणि स्नायू साखरेचा चांगला वापर करू शकतात. भाज्या, फळं, प्रथिनं, संपूर्ण धान्यं आणि फायबर असलेला संतुलित आहार, तसंच जास्त प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त पदार्थ मर्यादित ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. ज्या महिलांचं वजन जास्त आहे, त्यांच्यासाठी माफक पण सातत्यपूर्ण वजन कमी झाल्यानेही चयापचयाचं आरोग्य सुधारायला मदत होऊ शकते. काही महिलांमध्ये इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यासाठी किंवा PCOS शी संबंधित इतर समस्या नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर परिस्थितीनुसार औषधं सुचवू शकतात.
थोडक्यात, PCOS हा फक्त मासिक पाळी, प्रजननक्षमता किंवा अंडाशयांशी संबंधित आजार नाही, त्याचा दीर्घकालीन परिणाम चयापचयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. यामुळे PCOS असलेल्या महिलांमध्ये प्रीडायबेटीस आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढलेला असतो, आणि म्हणूनच नियमित साखर तपासणी व प्रतिबंधात्मक लाइफस्टाइलमधले बदल महत्त्वाचे ठरतात.