पालघरमध्ये ई-केवायसीसाठी शेवटची संधी: ३.५९ लाख शिधापत्रिकाधारकांची पडताळणी बाकी, ३० सप्टेंबरनंतर धान्य बंद
सार्वजनिक वितरण प्रणालीतील ई-केवायसी मोहीम अंतिम टप्प्यात आली असून पालघर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार १२१ लाभार्थ्यांची पडताळणी अजून बाकी आहे. ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी आणि बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा, यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात या कामापैकी सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तरीही साडेतीन लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी अजून आपली पडताळणी केलेली नाही.
यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत नोंदणी न करणाऱ्या नागरिकांचा दरमहाचा धान्यपुरवठा खंडित केला जाऊ शकतो, असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे. म्हणजेच ज्यांनी अजून ई-केवायसी केलेली नाही, त्यांच्यासाठी हे शेवटचे काही दिवस आहेत.
जिल्ह्यात मार्च २०२५ च्या नोंदीनुसार ९ लाखांपेक्षा जास्त कार्डधारकांची पडताळणी शिल्लक होती. पुरवठा विभागाने सतत पाठपुरावा केल्यामुळे एकूण १७ लाख ९५ हजार ७२९ उद्दिष्टांपैकी १४ लाख ३६ हजार ६०८ नागरिकांची ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. उरलेल्या ३ लाख ५९ हजार १२१ लाभार्थ्यांना शेवटची संधी मिळावी, म्हणून सर्व रास्त भाव धान्य दुकानांवर त्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपले नाव यादीत आहे का, हे लाभार्थ्यांना आपल्या दुकानात जाऊन पाहता येईल.
तालुक्यांनुसार पाहिले तर वसई तालुक्यात सर्वाधिक १ लाख ३ हजार ६४३ शिधापत्रिकाधारकांची केवायसी बाकी आहे. डहाणूत ६९,३९३, पालघर तालुक्यात ५७,४३५, जव्हारमध्ये ३९,७३२, वाड्यात ३१,८०९, विक्रमगडमध्ये २३,५९२ आणि तलासरीत २२,६२६ लाभार्थी प्रलंबित आहेत. सर्वात कमी म्हणजे १८,८५१ शिधापत्रिकाधारक मोखाडा तालुक्यात आहेत.
पडताळणीसाठी दोन पर्याय आहेत. लाभार्थी आपल्या जवळच्या रेशन दुकानात ओळखीच्या पुराव्यासह जाऊन ई-पॉस (e-POS) यंत्रावर बायोमेट्रिक म्हणजे अंगठ्याचा ठसा देऊन प्रमाणीकरण करू शकतात. घरबसल्या करायचे असेल, तर गूगल प्ले स्टोअरवरून MERA e-KYC किंवा Face eKYC हे अधिकृत अॅप डाऊनलोड करून स्वतःचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करता येते, अशी माहिती प्रशासनाने दिली. म्हणजे शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रेशन दुकानावर जाऊन केवायसी करायची आहे, किंवा घरबसल्या अधिकृत अॅपवरून करायची आहे.
पालघरच्या प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले म्हणाल्या, "शासनाच्या नियमानुसार रेशन वाटप प्रणालीतील पारदर्शकतेसाठी ही पडताळणी बंधनकारक आहे. अंतिम मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने ३० सप्टेंबरपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील नियमित धान्यपुरवठा अखंडित राहील."