सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
06:52 IST

पालघरमध्ये बिबट्याचा वावर, मथाणे, एडवण, उसरणी, घाटीममध्ये सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाचा सतर्कतेचा इशारा

पालघर तालुक्यातील मथाणे, एडवण, उसरणी आणि घाटीम परिसरात बिबट्याचा वावर असल्याने सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पालघरमध्ये बिबट्याचा वावर, मथाणे, एडवण, उसरणी, घाटीममध्ये सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाचा सतर्कतेचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पालघर तालुक्यातील मथाणे, एडवण, उसरणी आणि घाटीम या भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुधन यांच्या सुरक्षेबाबत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली. त्यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ग्रामस्थांशी संवाद साधला आणि बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले.

वनविभागाने काही सूचनाही दिल्या आहेत. लहान मुलांना घराबाहेर किंवा अंगणात एकटे सोडू नये. अंधार पडल्यानंतर मुलांनी निर्जन ठिकाणी, झाडी-झुडपांमध्ये किंवा शेताच्या परिसरात खेळायला जाऊ नये. ज्येष्ठ नागरिकांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी एकट्याने निर्जन भागात जाणे टाळावे, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी शक्यतो एकट्याने घराबाहेर पडू नये. घराचा परिसर, अंगण आणि गोठ्याजवळ पुरेसा उजेड ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.

गावातील पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी गायी, बैल, शेळ्या आदी जनावरे उघड्यावर न बांधता सुरक्षित आणि बंदिस्त गोठ्यात ठेवावीत. गोठ्याच्या परिसरात पुरेसा उजेड ठेवण्याचे आवाहनही वनविभागाने केले आहे.

नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षितता सांभाळताना वन्यजीवाला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचना पाळाव्यात, असे सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने सांगितले आहे.

परिसरात बिबट्याचा वावर आढळला तर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्याला स्वतःहून पकडण्याचा किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्या आढळल्यास तातडीने महाराष्ट्र वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ