पडोलीत पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून २८ गोवंशीय जनावरे सोडवली, चालकाला अटक
पडोली पोलिसांनी वरोडा गावाजवळ आयचर ट्रक अडवून २८ जनावरांची सुटका केली; २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालकाला अटक करण्यात आली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पडोली पोलिसांनी गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा एक आयचर ट्रक पाठलाग करून पकडला. या कारवाईत ट्रकमधून २८ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. वाहन, जनावरे आणि मोबाईल मिळून एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाई पडोली चौकाजवळ सुरू झाली आणि वरोडा गावाच्या परिसरात ट्रक थांबवण्यात आला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पडोली पोलीस ठाण्याचे पथक पडोली चौकासमोर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. त्याच वेळी एका आयचर ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. काही वेळातच चंद्रपूरकडून इरई नदी मार्गाने येणारा, लाल रंगाचा आणि निळ्या ताडपत्रीने झाकलेला ६ चाकी आयचर ट्रक (क्र. MH-28-BB-4970) येताना दिसला.
पडोली चौकाजवळ पोलिसांनी हात दाखवून चालकाला वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवण्याचा इशारा केला. चालकाने मात्र गाडी थांबवली नाही. एका पेट्रोल पंपाच्या आवारातून यु-टर्न घेऊन त्याने विरुद्ध दिशेने (राँग साईड) अतिवेगाने ट्रक पळवला.
पुढे कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा गावाच्या दिशेने तो गेला. पोलिसांनी लगेच पाठलाग सुरू केला आणि वरोडा गावातील रस्त्यावर अडथळा उभा करून ट्रक थांबवण्यास भाग पाडले. ट्रक थांबताच चालक गाडी जागेवरच सोडून शेतात पळू लागला. मात्र दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला शेतशिवारात पकडले.
ट्रकची बारकाईने पाहणी केली असता त्यात कोंबून भरलेली २८ जिवंत गोवंशीय जनावरे (बैल व गायी) आढळून आली. पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेतली. १ लाख ८३ हजार रुपये किमतीची २८ जनावरे, २० लाख रुपयांचा टाटा कंपनीचा आयचर ट्रक आणि १० हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी ट्रकचालक अब्दुल हफिज गुफ्रान खान (वय ३३, रा. वार्ड क्र. ०४, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात अप. क्र. ३१६/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारीत २०१५) च्या कलम ५(१), ५(ब), ९, ११ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१)(ड) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३२/१७९, १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे, पोलीस हवालदार विनोद वानकर, पोलीस अमंलदार धिरजकूमार लोधी, समीर खाडे, श्रिनीवास वाभीटकर आणि धिरज भोयर यांच्या पथकाने ही कारवाई केली.