पाचोऱ्यात स्मार्ट रूफटॉप सोलर योजनेला चांगला प्रतिसाद, अर्जानंतर आठ ते दहा दिवसांत प्रक्रिया पूर्ण होण्याची
महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणमध्ये 12 हजार 6 घरगुती ग्राहकांनी 1 किलोवॅट सोलरसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 1 हजार 800 ते 1 हजार 850 घरांवर सोलर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सर्वसामान्य घरगुती ग्राहकांचे वीज बिल कमी करण्याबरोबरच ते शून्यावर आणण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 'स्मार्ट' रूफटॉप सोलर योजना राबवली जात आहे. या योजनेला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणअंतर्गत 12 हजार ग्राहकांनी 1 किलोवॅट सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
आतापर्यंत सुमारे 1 हजार 800 ते 1 हजार 850 ग्राहकांच्या घरांवर सोलर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाकीच्या ग्राहकांचे अर्ज भरण्याचे काम अजूनही चालू आहे.
महावितरणच्या पाचोरा उपविभाग ग्रामीणमध्ये पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, नांद्रा, लासगाव आणि लोहारा हे पाच सेक्शन येतात. या पाच सेक्शनमधील सुमारे 45 ते 46 गावांत मिळून 18 हजार 500 घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी 12 हजार 6 ग्राहकांनी सरकारच्या 'स्मार्ट' रूफटॉप सोलर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर वाढण्याची शक्यता आहे.
या योजनेत 1 किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टीमसाठी लाभार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ठरावीक रक्कम भरावी लागणार आहे. बीपीएल प्रवर्गातील ग्राहकांना 2 हजार 500 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ग्राहकांसाठी ही रक्कम 5 हजार रुपये आहे. ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम भरल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या घरावर सोलर सिस्टीम बसवण्याची प्रक्रिया केली जाते.
योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वात आधी 1 किलोवॅट सोलर ॲक्टिव्हेशनसाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी वीज बिल आणि आधारकार्ड ही प्रमुख कागदपत्रे लागतात. एकाच वेळी साधारण दहा अर्ज आले की संबंधित वेंडरमार्फत सोलर बसवण्याचे काम सुरू होते. ही प्रक्रिया साधारण आठ ते दहा दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. सोलर सिस्टीम सुरू झाल्यावर त्याचा थेट परिणाम वीज बिलावर दिसतो.
विशेष म्हणजे, 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलरमधून होणारी वीजनिर्मिती आणि वापर यानुसार जमा होणाऱ्या युनिटचा ग्राहकांना फायदा होतो. त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
ज्या ग्राहकांचे वीज बिल जास्त येते, त्यांना त्यांच्या विजेच्या वापरानुसार 1 किलोवॅट, 3 किलोवॅट किंवा 5 किलोवॅट क्षमतेची सोलर सिस्टीम बसवता येणार आहे. म्हणजेच जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही आपल्या गरजेनुसार सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.