OPPO ने आणली ColorOS 17, Find X10 सीरीजमध्ये आधी मिळणार; AI फीचर्सवर भर
OPPO ने आपली नवी ऑपरेटिंग सिस्टम ColorOS 17 सादर केली आहे. रेंडरिंगचे काम 30% आणि RAM चा वापर 25% कमी झाल्याचा कंपनीचा दावा आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
OPPO ने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम ColorOS 17 सादर केली आहे. आजवरची सगळ्यात स्मूथ, जास्त हुशार आणि जास्त सुरक्षित सिस्टम असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ही सिस्टम आधी नवीन Find X10 सीरीजमध्ये मिळेल, आणि नंतर OPPO च्या बाकीच्या फोनमध्ये अपडेट म्हणून येईल.
OPPO नेहमी आपल्या OS च्या स्मूथनेसवर काम करते. ColorOS 15 आणि 16 मध्ये अॅनिमेशनवर भर होता. आता ColorOS 17 मध्ये Living Flow Design नावाची नवी गोष्ट आणली आहे. फोनला हात लावल्यावर सगळे मऊ आणि नैसर्गिक वाटेल, असा याचा उद्देश आहे. यात तीन मुख्य गोष्टी आहेत.
पहिली म्हणजे Luminous Effect. स्क्रीनचा लूक थोडा चमकदार आणि थोडा ट्रान्सपरंट होईल, बघायला भारी वाटेल आणि डोळ्यांना त्रास होणार नाही. दुसरी Fluid Motion. एका अॅपमधून दुसऱ्या अॅपमध्ये जाताना किंवा काही ओपन-क्लोज करताना अडकणे किंवा तुकडे पडणे होणार नाही, सगळे पाण्यासारखे फ्लो होईल. तिसरी Flexible Feedback. बटणावर क्लिक केल्यावर ते खरोखर दाबल्यासारखे आत जाईल आणि परत येईल.
कंपनीने आतून पूर्ण इंजिनच बदलले असून त्याला Unified Rendering Architecture असे नाव दिले आहे. त्यामुळे फोनवरचा भार खूप कमी होईल. जुन्या व्हर्जनपेक्षा रेंडरिंगचे काम 30% कमी झाले आहे आणि RAM चा वापर 25% कमी लागतो. म्हणजे मोठा गेम खेळला तरी फोन गरम होणार नाही किंवा हँग होणार नाही, असा दावा आहे.
Laminar Flow Engine मुळे स्पीड आणखी वाढला आहे. अॅप उघडणे 55% जास्त स्टेबल झाले आहे. गॅलरी पहिल्यांदा उघडली की फोटो 50% जास्त वेगाने दिसतील. तुम्ही 25% जास्त अॅप एकाच वेळी बॅकग्राउंडला चालू ठेवू शकता. व्हाट्सअप, इंस्टा, युट्युब सगळे चालू ठेवले तरी फोन स्लो होणार नाही. OPPO ने एक टेस्ट पण केली आहे. फोन 6 वर्षे वापरला आणि मेमरी 90% भरली तरी फोनचा स्मूथनेस 90% टिकून राहतो.
यावेळी सगळ्यात मोठा बदल AI मध्ये झाला आहे. AI Mind Pilot मध्ये आता Agent Mode आला आहे. हा फोनमधले फोटो आणि फाईल्स स्वतः शोधेल आणि नीट लावून देईल. ट्रिपचे फोटो इकडे-तिकडे पडले असतील तर तो ते एका अल्बममध्ये लावेल, तारखेनुसार नाव देईल आणि त्या फोटोंवरून ट्रिप प्लॅन किंवा वेबपेज पण बनवून देईल. एखादा फोटो घेऊन त्याचे vlog चे कव्हर पण बनवेल.
फोटो एडिट करण्यासाठी AI Photo Agent आला आहे. एखाद्या दुसऱ्या फोटोसारखे कलर हवे असतील तर तो फोटो दाखवायचा, मग हा AI तुमच्या फोटोला तसाच कलर देईल. "बॅकग्राउंड ब्लर कर" असे लिहिले तर तो करून देईल. या फोटोत काय चांगले दिसेल हे तो स्वतःहून पण सुचवेल.
AI Mind Space आता जास्त हुशार झाले आहे. त्यात PDF, डॉक्युमेंट किंवा युट्युब व्हिडिओची लिंक सेव्ह करता येते. तो सगळे वाचून समजून घेईल आणि हवे तेव्हा शोधून देईल. फिरायच्या जागा सेव्ह केल्या असतील तर तो पूर्ण ट्रिपचा नकाशा बनवून देईल. AI Mind Suggest पर्सनल असिस्टंटसारखे काम करेल. सकाळी दिवसाचे अपडेट देईल, फ्लाईट असेल तर डिटेल्स दाखवेल आणि हेडफोन लावताच गाणी लावायला सुचवेल.
OSee नावाचे एक फीचर पण आहे. कॅमेरा एखाद्या गोष्टीवर धरला की तो लगेच ओळखेल. ती वस्तू काय आहे, तिच्याबद्दल माहिती, त्यात किती कॅलरी आहेत, ते स्कॅन करणे किंवा ट्रान्सलेट करणे सगळे एका क्लिकवर होईल.
AI वापरताना डेटा चोरीची भीती असते. त्यासाठी OPPO ने Private Computing Cloud दिले आहे. तुमचा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्ट राहील. त्यात आता पोस्ट-क्वांटम सिक्युरिटी पण जोडली आहे, त्यामुळे भविष्यातले हॅकर्स पण डेटा चोरू शकणार नाहीत. एक नवीन Transparency Report पण येणार आहे, त्यात कोणते AI फीचर कधी वापरले याची सगळी माहिती दिसेल.
AI Call Guard हे देखील महत्त्वाचे आहे. आजकाल AI आवाजाने फ्रॉड कॉल येतात. हा गार्ड कॉल चालू असतानाच आवाज खरा आहे की AI ने बनवला आहे हे ओळखेल आणि लगेच सावध करेल. थोडक्यात, ColorOS 17 हा फक्त अपडेट नाही, तर फोन वापरण्याचा पूर्ण अनुभव बदलणारा आहे.