ओंकार भोजने फोन उचलत नाही; दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा 'अफरातफरी'च्या प्रमोशनवरून संताप
'अफरातफरी' चित्रपटाच्या प्रमोशनला ओंकार भोजने हजर नसल्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
मराठी सिनेमातला आगामी 'अफरातफरी' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये येणार आहे आणि सध्या याची पूर्ण टीम प्रमोशनच्या कामात गुंतलेली आहे. पण यातच काही कलाकार प्रमोशनला येत नसल्याची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर 'अफरातफरी'चे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजने याच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मिलिंद कवडे यांनी 'महा MTB'ला दिलेल्या मुलाखतीत ओंकारच्या प्रमोशनमधल्या सहभागाबद्दल भाष्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, जूनमध्येच ओंकारला सांगण्यात आलं होतं की चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. पण त्यानंतर प्रमोशनसाठी त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असं कवडे यांनी सांगितलं.
"ओंकार एवढा बिझी आहे की तो कोणाचाच फोन उचलत नाही. आम्हा तिघांचेही त्याने फोन उचलले नाहीत. कॉल केला की एकच मेसेज येतो, 'दादा मी तुला कॉलबॅक करतो.' गेल्या चार महिन्यांपासून हेच सुरू आहे," असं मिलिंद कवडे म्हणाले.
ओंकारकडून काही प्रतिसाद येत नसल्याने शेवटी निर्मात्यांनीही त्याला मेसेज पाठवून नाराजी कळवली, असं कवडे यांनी सांगितलं. चित्रपटासाठी निर्माते मोठी गुंतवणूक करत असतात, त्यामुळे कलाकारांनी निदान प्रमोशनमध्ये तरी सहकार्य करायला हवं, असं मत त्यांनी मांडलं.
कवडे यांनी यावेळी अभिनेते मोहन आगाशे यांचंही उदाहरण दिलं. मोहन आगाशे हैदराबादमध्ये असतानाही त्यांनी तिथून सेल्फी व्हिडीओ पाठवून चित्रपटाचं प्रमोशन केलं, असं कवडे म्हणाले. शिवाय ते स्वतः प्रमोशनसाठी हजरही राहिले, असंही त्यांनी सांगितलं.
या सगळ्या प्रकारानंतर आपण पुढच्या चित्रपटात ओंकार भोजनेला अजिबात घेणार नाही, असं मिलिंद कवडे यांनी ठामपणे सांगितलं. "आता मी कानाला खडा लावलाय. पुढच्या चित्रपटात ओंकारला अजिबात घेणार नाही. मी आतापर्यंत खूप काम केलंय, पण यात तो खूप अनप्रोफेशनल आहे. दिग्दर्शकाचा फोन न उचलणं, निर्मात्यांचा फोन न उचलणं, EP ला गंडवणं आणि सतत 'येतो-येतो' म्हणत राहणं... याला अनप्रोफेशनलच म्हणतात," असं कवडे यांनी सांगितलं.
ओंकारच्या अभिनयाबद्दल मात्र कवडे यांनी कौतुक केलं. "तो कलाकार म्हणून उत्तम आहे, चांगलं काम करतो. पण माणूस म्हणून सॉरी! खूप अनप्रोफेशनल... तो सराईत खोटारडा आहे," असं ते मुलाखतीत म्हणाले.
दरम्यान, या आरोपांवर ओंकार भोजनेने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मिलिंद कवडे यांनी केलेल्या या आरोपांवर ओंकारची बाजू पुढे येणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'अफरातफरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्याच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू आहे.