नव्हिटास सोलर पाच वर्षांत महाराष्ट्र व गुजरातमध्ये १०,००० कोटी रुपये गुंतवणार
भारतातील आघाडीची सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनी नव्हिटास सोलरने पुढील पाच वर्षांत १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
भारतातील आघाडीच्या सोलर मॉड्यूल उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या नव्हिटास सोलरने आज मोठी घोषणा केली. पुढील पाच वर्षांत कंपनी १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या पैशातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकात्मिक नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था उभी केली जाईल.
या नियोजित गुंतवणुकीमुळे कंपनीच्या संपूर्ण सोलर मूल्य साखळीतील विस्ताराला गती मिळणार आहे. त्यात इनगॉट्स, वेफर्स, उच्च-कार्यक्षम सोलर सेल्स आणि मॉड्यूल्स यांचा समावेश आहे. याशिवाय बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स (बीईएसएस) आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीपर्यंतच्या टप्प्यांनाही या गुंतवणुकीचा फायदा होईल.
केवळ सोलर मॉड्यूल बनवणारी कंपनी एवढीच ओळख न ठेवता एकात्मिक स्वच्छ ऊर्जा कंपनी होण्याच्या दिशेने हे नव्हिटास सोलरचे महत्त्वाचे पाऊल आहे. नवीकरणीय ऊर्जा मूल्य साखळीच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम अशा दोन्ही क्षेत्रांत आपली उपस्थिती अधिक भक्कम करण्याचा कंपनीचा मनसुबा आहे. त्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता उभारणे, पुरवठा साखळी सक्षम करणे आणि मोठ्या प्रमाणावरील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात सहभागी होणे, यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
कंपनी आता फक्त उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवणूक या क्षेत्रांतही ती पाऊल टाकत आहे. महाराष्ट्रात नव्हिटास सोलर दोन सोलर पार्क्स विकसित करत आहे. ईपीसी मॉडेलखाली २०० मेगावॅट आणि इंडीपेन्डंट पॉवर प्रॉड्युसर (आयपीपी) मॉडेलखाली २५ मेगावॅट क्षमतेचा पार्क उभा राहतो आहे. गुजरातमध्ये वडोदरा येथे ५ जीडब्ल्यूएच क्षमतेच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पातून कंपनी ऊर्जा साठवणूक क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेतील कंपनीची ताकद वाढेल.
कंपनीचे डायरेक्टर अंकित सिंघानिया म्हणाले, "भारताचा नवीकरणीय ऊर्जेचा प्रवास अद्वितीय टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे कामाचा आवाका, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या क्षेत्राची स्पर्धात्मकता ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतील. नव्हिटास सोलरमध्ये, आम्हाला संपूर्ण मूल्य साखळीत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि क्षमतांची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे आम्ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनामध्ये मोलाचे योगदान देण्यास सक्षम होऊ. पुढील पाच वर्षांतील आमच्या १०,००० कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणुकीमधून ही महत्त्वाकांक्षा दिसून येते. आम्ही उत्पादन क्षमतेसह भारतातील नवीकरणीय ऊर्जा परिसंस्थेच्या पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक करत आहोत."
ही नियोजित गुंतवणूक कंपनीच्या सध्याच्या उत्पादन पायावर उभी राहणार आहे. नव्हिटास सोलरची वार्षिक ३ गिगावॅट सोलर मॉड्यूल निर्मिती क्षमता आहे. कंपनी टॉपकॉन आणि बायफेशिअल मोनो पीईआरसी तंत्रज्ञानासह उच्च-कार्यक्षम सोलर मॉड्यूल्स तयार करते. सोलर एनकॅप्सुलंट व्यवसायात नव्हिटास अल्फाच्या माध्यमातून कंपनीने बॅकवर्ड इंटिग्रेशन साधले आहे. तसेच नव्हिटास प्लॅनेट यांसारख्या उपकंपन्यांतून नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.
भारतातील युटिलिटी-स्केल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांबरोबरच कंपनीचा ईपीसी व्यवसाय दक्षिण आफ्रिका प्रदेशातही आपली उपस्थिती वाढवत आहे. तिथे युटिलिटी आणि आयपीपी स्तरावरील प्रकल्प राबवण्यासाठी हा विस्तार सुरू आहे.