नोएल टाटा यांचा चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप, बोर्ड बैठकीचे रेकॉर्डिंग मागितले
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला पत्र लिहून एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
टाटा ट्रस्टमध्ये सुरू असलेली धुसफूस आता लपून राहिलेली नाही. अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे आणि त्याला आता नवं वळण मिळालं आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळला आहे. त्यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळाला पत्र लिहून हा प्रश्न मांडला, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी दिली आहे.
नोएल टाटा यांनी संचालक मंडळाच्या बैठकीचं व्हिडीओ रेकॉर्डिंग देण्याची मागणी केली आहे. शिवाय या प्रकरणात कायदेशीर मतं का घेतली गेली, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ३० सप्टेंबर रोजी पाठवलेल्या एका ईमेलमध्ये त्यांनी म्हटलं की, चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती हा बैठकीच्या अजेंड्यावरचा विषय नव्हता. तरीही 'NRC कडून माहिती' या विभागात तो मुद्दा मांडण्यात आला. याआधी १७ सप्टेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कोणताही ठराव मंजूर झाल्याचं त्यांनी नाकारलं होतं.
समूहातले सर्वात मोठे शेअर होल्डर असलेल्या टाटा ट्रस्ट्सनं तर चंद्रशेखरन यांची तिसऱ्यांदा पुनर्नियुक्ती करणारा संचालक मंडळाचा प्रस्ताव "बेकायदेशीर" आणि "कायदेशीररित्या अवैध" ठरवला आहे. ट्रस्टच्या कडक शब्दांतल्या निवेदनात म्हटलं आहे की, नोएल टाटा हे टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक आहेत आणि त्यांनी बैठकीत या पुनर्नियुक्तीच्या विरोधात मतदान केलं.
दुसरीकडे, टाटा सन्सनं एन. चंद्रशेखरन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणखी पाच वर्षांसाठी पुन्हा नेमण्याचा आपला निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. त्याच्या समर्थनात त्यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश उदय उमेश ललित आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांच्या कायदेशीर मतांचा हवाला दिला. अहवालानुसार, या दोन्ही न्यायाधीशांनी ठराव "योग्यरित्या मंजूर" झाल्याचं मानलं. त्यांच्या मते, कलम १०४(ब) खाली नेमलेले संचालक समान मतांनी विभागले गेले, तेव्हा निर्णायक मतानं कलम १२१ च्या अटी पूर्ण झाल्या.
टाटा ट्रस्ट्सची भूमिका वेगळी आहे. दोन्ही नामनिर्देशित संचालकांनी पुनर्नियुक्तीला पाठिंबा देणं आवश्यक होतं, असा त्यांचा युक्तिवाद आहे. यासाठी त्यांनी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या मताचा दाखला दिला. टाटा सन्सचं घटनापत्रक, विशेषतः नामनिर्देशित संचालक आणि अध्यक्षांच्या निर्णायक मतासंबंधीचे नियम, हेच या वादाचं मुख्य कारण आहे.
टाटा ट्रस्ट्सचे दुसरे नामनिर्देशित संचालक वेणू श्रीनिवासन यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला पाठिंबा दिला. चंद्रशेखरन स्वतः या प्रक्रियेपासून दूर राहिले आणि स्वतंत्र संचालक हरीश मनवाणी यांनी चर्चेचं अध्यक्षपद सांभाळलं. शेवटी अध्यक्षांच्या निर्णायक मतानं हा ठराव मंजूर झाला.