नोएडा एक्सप्रेसवेवर धावत्या खासगी बसला आग; ३२ प्रवासी सुखरूप बाहेर पडले
नोएडा सेक्टर १५० येथे मंगळवारी संध्याकाळी एका खासगी बसला अचानक आग लागली; संपूर्ण बस जळून खाक झाली, मात्र सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मंगळवारी संध्याकाळी नोएडा एक्सप्रेसवेवर नोएडा सेक्टर १५० येथे एका खासगी बसला अचानक आग लागली. आग लागताच बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडण्यासाठी धावाधाव केली. या घटनेत संपूर्ण बस आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बसमध्ये साधारण ३२ प्रवासी होते. माहितीनुसार ही बस दिल्लीहून बिहारला जाण्यासाठी निघाली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ती बिहारमधील मुझफ्फरपूरकडे जात होती, मात्र वाटेतच ही घटना घडली. अनेक प्रवाशांनी आपले सामान बसमध्येच ठेवले आणि फक्त जीव वाचवण्यासाठी ते बसबाहेर पडले.
ही घटना नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत, नोएडा-ग्रेटर नोएडा द्रुतगती मार्गावर सेक्टर १५० जवळ घडली. बसला आग लागल्याची बातमी पसरताच लोक घाबरले आणि सर्व जण बसबाहेर पडू लागले. सुदैवाने वेळेतच सर्व प्रवासी बाहेर आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. ३२ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते, असेही सांगितले जाते.
आग पुढे इतकी वाढली की संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत मोठ्या ज्वालांमध्ये बस दिसेनाशी झाल्याचे दिसते. यावरून घटना किती भीषण होती याची कल्पना येते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ही स्लीपर बस नोएडाहून आग्र्याकडे जात होती. नॉलेज पार्क परिसरातील द्रुतगती मार्गावर अचानक बसला आग लागली आणि ती झपाट्याने पसरून बस जळू लागली. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. नॉलेज पार्क पोलीस ठाण्याचे पथकही तेथे दाखल झाले.
आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही आणि पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेमुळे एक्सप्रेसवेवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
या घटनेचा व्हिडिओ @sirajnoorani नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने "पण आग नक्की लागली कशी?" असे विचारले, दुसऱ्याने "बापरे, घटना फारच भीषण दिसतेय" असे लिहिले, तर आणखी एका यूजरने "यातील प्रवासी जिवंत वाचले की नाही?" असा प्रश्न केला.
या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडिओवर आधारित आहे.