लिंबाची साल फेकू नका, त्यापासून बनवा डासांना दूर ठेवणारा दिवा; पूनम देवनानी यांनी सांगितला घरगुती उपाय
लिंबू, कडुलिंब, कापूर, लवंग आणि दालचिनी वापरून घरच्या घरी डास प्रतिबंधक दिवा कसा बनवायचा, हे प्रसिद्ध इंटरनेट पर्सनॅलिटी पूनम देवनानी यांनी सांगितले आहे.
बदलत्या हवामानात डास ही घरातील एक मोठी समस्या ठरते आणि ती सर्वांनाच त्रासदायक वाटते. विशेषतः संध्याकाळ जवळ येताच डासांचे थवे घरांभोवती घिरट्या घालू लागतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी अनेक जण कॉइल्स, स्प्रे आणि इतर डास प्रतिबंधक वापरतात.
डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांचाही वापर करता येतो. प्रसिद्ध इंटरनेट पर्सनॅलिटी पूनम देवनानी यांनी डासांना दूर ठेवण्याची अशीच एक नैसर्गिक पद्धत सांगितली आहे. हा घरगुती उपाय म्हणजे लिंबू आणि कडुलिंबाच्या मदतीने बनवलेला डास प्रतिबंधक दिवा आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, हा उपाय करून डासांचा नायनाट करता येतो.
हा दिवा बनवण्यासाठी एक लिंबू, कडुलिंबाची काही पाने, थोडा कापूस, थोडे कडुलिंबाचे तेल किंवा मोहरीचे तेल, २-३ कापराच्या काड्या, ५-६ लवंगा आणि १ दालचिनीची काडी एवढे साहित्य लागते.
पूनम देवनानी यांनी सांगितलेली कृती अशी आहे. सर्वात आधी एक लिंबू कापून त्याचा रस काढायचा. त्यानंतर चमच्याने लिंबाच्या दोन्ही अर्ध्या भागांतला उरलेला गर पूर्णपणे स्वच्छ करायचा. या दिव्यासाठी फक्त अर्ध्या लिंबाची साल लागते.
लिंबू स्वच्छ झाले की कडुलिंबाची काही पाने वाळवून हलक्या हाताने ठेचायची आणि ती लिंबाच्या सालीत ठेवायची. त्यानंतर कापसापासून एक लहान वात बनवून तीही सालीत ठेवायची. वातीवर थोडे कडुलिंबाचे तेल टाकायचे. कडुलिंबाचे तेल उपलब्ध नसेल, तर मोहरीचे तेल वापरता येते.
यानंतर वातीच्या भोवती थोडा कापूर ठेवायचा. लवंग आणि दालचिनी ठेचून त्यांची थोडी पूड वातीजवळ ठेवायची. गरज वाटली तर आणखी थोडे तेल घालायचे.
आता ही वात पेटवायची आणि जिथे डास जास्त प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी हा दिवा ठेवायचा. इच्छा असेल तर असे २ किंवा ३ दिवे बनवून घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत ठेवता येतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या दिव्याच्या वासामुळे डास दूर राहतात आणि घरात हा दिवा लावल्याने नैसर्गिक पद्धतीने डासांना दूर ठेवता येते. विशेषतः संध्याकाळी हा दिवा लावला, तर एकही डास दिसणार नाही आणि लिंबू, कडुलिंब, लवंग, कापूर व दालचिनीचा सुगंध घरभर पसरेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे डासांना दूर ठेवण्यासाठी हा उपाय करून पाहता येईल.