नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बाजारपेठ बंद; शेप यांना कार्डिओलॉजिस्टकडून उपचार घेण्याची सूचना
कर्जत तालुक्यातील नेरळ गावात गोरख शेप यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी बाजारपेठ बंद राहिली. आरोग्य विभागाने शेप यांना रुग्णालयात दाखल करून उपचार व्हावेत, अशी सूचना केली आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ गावात उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज सकाळपासून बाजारपेठ बंद राहिली. मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी 28 सप्टेंबरपासून गावातील प्रश्न मार्गी लागावेत म्हणून उपोषण सुरू केले आहे. तीन दिवस उपोषण केल्यानंतरही त्यांची एकही मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे नेरळमधील ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
शेप यांचे उपोषण नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सुरू आहे. त्यांच्या एकूण 13 मागण्या आहेत. नेरळ ग्रामपंचायतीशी संबंधित तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी संबंधित विषय मार्गी लागावेत, अशी त्यांची मागणी आहे. नेरळ ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्या कारभाराची चौकशी व्हावी आणि नेरळ नगरपरिषद व्हावी, अशाही मागण्या त्यात आहेत. तीन दिवसांच्या उपोषणाच्या काळात यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर "आम्ही नेरळकर" ग्रुपने नेरळ बंदचे आवाहन केले. आधी असंख्य तरुणांनी बाजारपेठेत फिरून दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी नेरळ बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आज सकाळपासून गावातील बाजारपेठ बंद दिसली. आवाहनानंतर आज सकाळपासून बंद 100 टक्के यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.
नेरळमधील व्यापारी, फेरीवाले आणि फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे या सर्वांनी आवाहनानुसार आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. नेरळ बंदचे आवाहन करणारे कोणतेही पत्र पोलीस स्टेशनकडे दिलेले नाही, अशी माहिती पोलीस स्टेशनकडून मिळत आहे. मात्र आपल्या गावातील प्रश्न सुटावेत म्हणून उपोषण सुरू असल्याने बाजारपेठ बंद ठेवून पाठिंबा दिल्याचे दिसते.
दरम्यान, मध्यरात्रीनंतरही उपोषणकर्ते शेप यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे शेवटी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढून आरोग्य तपासणी केली. शेप हे हृदयरोगाचे रुग्ण आहेत आणि त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेता ईसीजी चाचणी करण्यात आली असून कार्डिओलॉजिस्टकडून उपचार घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने नेरळ पोलीस आणि प्रशासन यांना अशी सूचना करण्यात आली आहे की, शेप यांना रुग्णालयात दाखल करून कार्डिओलॉजिस्टच्या देखरेखीखाली उपचार व्हावेत. त्यामुळे आज चौथ्या दिवसानंतरही उपोषण सुरू राहिले, तर प्रशासन शेप यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.