वर्धा पोलिसांचा नवरात्रोत्सवासाठी बंदोबस्त; दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात, लेझर लाईटला बंदी
नवरात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी वर्धा पोलीस दलाने ध्वनी प्रदूषण, लेझर लाईट, सोशल मीडिया आणि बंदोबस्ताची व्यापक तयारी केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आगामी नवरात्रोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा आणि ध्वनी प्रदूषण तसेच लेझर लाईटच्या वापरावर नियंत्रण राहावे, यासाठी वर्धा पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा जपणारा व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३६ आणि कलम ३८(१) अन्वये पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी आदेश काढले आहेत. जिल्हाधिकारी, वर्धा यांनीही कलम १६३ BNSS अन्वये आदेश जारी केले आहेत. ध्वनीक्षेपक, लाऊडस्पीकर, अॅम्प्लीफायर आणि इतर उपकरणे वापरताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि शासनाने ठरवलेल्या ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्रांमध्ये Noise Level Meter द्वारे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्सवात आवाजाची पातळी वाढली किंवा नियम मोडले गेले, तर त्यावर लक्ष ठेवता येईल. मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणार आहे.
मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांतील Laser Light मुळे नागरिक, वृद्ध, लहान मुले आणि विशेषतः वाहनचालकांच्या डोळ्यांना धोका होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कलम १६३ BNSS अन्वये लेझर लाईटच्या वापरावर प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
आयोजक मंडळे, ध्वनीक्षेपक चालक-मालक, शांतता समिती आणि नागरिक यांच्यात समन्वय राहावा, यावर पोलिसांनी भर दिला आहे. त्यासाठी उपकरणांचे मालक, मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यात उत्सवातील नियम, ध्वनी मर्यादा, मिरवणुकीतील शिस्त, वाहतूक व्यवस्था आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियम मोडल्यास संबंधित व्यक्ती, आयोजक, डीजे चालक-मालक किंवा जबाबदार व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई होईल, असेही या बैठकांत सांगण्यात आले.
कोणत्याही अनुचित प्रसंगाला तातडीने प्रतिसाद देता यावा, म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी जलद प्रतिसाद, जमाव नियंत्रण आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण याचा प्रत्यक्ष सराव केला. जिल्ह्यातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या भागांमध्ये रूट मार्च काढण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश यातून देण्यात आला.
सोशल मीडियावरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे उत्सवाच्या संपूर्ण काळात २४x७ Social Media Monitoring Cell सुरू राहणार आहे. अफवा, आक्षेपार्ह किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, संदेश पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पुढे पाठवू नयेत, संशयास्पद माहिती आढळल्यास ती व्हायरल न करता लगेच पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी केले आहे.
बंदोबस्तासाठी ११४ पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथके, १ जलद प्रतिसाद पथक, १००० होमगार्ड आणि २ एस.आर.पी.एफ. तुकड्या तैनात राहतील. दुर्गा मंडळे, मिरवणूक मार्ग, संवेदनशील आणि गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या चौकांवर गरजेनुसार अतिरिक्त बंदोबस्त लावला जाईल.
दुर्गा मंडळे आणि नागरिकांना उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस पूर्ण सहकार्य करतील. मात्र कायद्याचे उल्लंघन, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन, प्रतिबंधित लेझर लाईटचा वापर, सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी कृत्ये, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृती किंवा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.
यंदा वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस ठाणे स्तरावर "नवदुर्गा सन्मान-२०२६" ही पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा तिचा हेतू आहे. दामिनी पथक आणि महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती, नारीशक्ती, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, मुलींचे शिक्षण, पर्यावरण संवर्धन व स्वच्छता, सुरक्षित उत्सव व्यवस्थापन आणि "Save Water" संकल्पनेतील उपक्रम अशा विषयांत उत्कृष्ट काम करणाऱ्या मंडळांना पोलीस ठाणे आणि जिल्हा स्तरावर पारितोषिक देऊन गौरवले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी सांगितले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने मंडळांनी "Save Water" संकल्पना राबवून पाणी बचतीबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांना उत्सव उत्साहात, पण शांतता, शिस्त आणि कायद्याचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दुर्गा मंडळांनी ध्वनी मर्यादा, मिरवणुकीचे नियम, आदर्श आचारसंहिता, वाहतूक व्यवस्था आणि प्रशासनाच्या सर्व सूचना पाळाव्यात, प्रतिबंधित लेझर लाईट वापरू नये, असे ते म्हणाले. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास लगेच पोलिसांना कळवावे, वर्धा पोलीस दल २४ तास सेवेसाठी सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.