जय जय स्वामी समर्थ मालिकेत नवरात्रीत स्वामी आणि रणजीत यांच्यात संघर्ष
'जागर शक्तीचा - महिमा स्वामींचा' या विशेष भागांमध्ये स्वामी चार पीडित स्त्रियांना त्यांच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देणार आहेत.
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत नवरात्रीच्या निमित्ताने एक खास पर्व सुरू होणार आहे. 'जागर शक्तीचा - महिमा स्वामींचा' असं या विशेष भागांचं नाव आहे. नवरात्री म्हणजे आदिशक्तीचा उत्सव, स्त्रीच्या सामर्थ्याचा जागर आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा, या पार्श्वभूमीवर हे भाग येत आहेत. यात स्वामी काही पीडित स्त्रियांना एकत्र आणतील आणि त्यांच्या मनात दडलेल्या शक्तीची त्यांना जाणीव करून देतील.
या पर्वाच्या केंद्रस्थानी आहे रणजीत. तो अक्कलकोटच्या सुभेदाराचा मेव्हणा आहे. सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करून त्याने गावातील अनेकांवर अन्याय केला आहे. त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या चार स्त्रियांची कहाणी या भागांतून समोर येणार आहे.
या चौघींची परिस्थिती वेगवेगळी आहे, पण त्यांच्या वेदनेचं मूळ एकच आहे, ते म्हणजे रणजीतची महिषासुरी प्रवृत्ती. म्हणूनच पुढच्या भागांमध्ये स्वामी विरुद्ध रणजीत असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
कथेची सुरुवात स्वामींच्या एका विलक्षण लीलेने होते. येणाऱ्या नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर होणार आहे, याची जाणीव स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना करून देतात. त्यानंतर चार स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्षाची काळी बाजू हळूहळू उलगडू लागते.
पहिली कथा मधुवंतीची आहे. ती अवघ्या २१ वर्षांची आहे. रणजीतमुळे तिचं कुंकू पुसलं गेलं आहे. तिच्या पतीने रणजीतसोबतची कुस्ती जिंकली होती आणि रणजीतने त्याची हत्या केली आहे. पतीच्या मृत्यूनंतर मधुवंती मंदिरात जाऊन न्यायासाठी आक्रोश करते, आणि तिथेच तिच्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश होतो.
स्वामी मधुवंतीला धीर देतात आणि "तुला न्याय मिळेल" असं आश्वासन देतात. पण न्यायाचा तिचा प्रवास सोपा नाही. तिच्या दुःखातही रणजीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. तिच्या पतीच्या मृत्यूनंतरच्या विधींमध्येही तो विघ्न आणणार आहे. तरीही प्रत्येक वेळी स्वामींची लीला मधुवंतीच्या मदतीला धावून येणार आहे.
मधुवंतीच्या कथेसोबतच स्वामी आणि रणजीत यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडते. स्त्रियांच्या आत्मसन्मानाला आव्हान देणाऱ्या रणजीतला स्वामी ठाम शब्दांत सुनावतात. स्त्रिया दुर्बल आहेत आणि त्या आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असा अहंकार रणजीतच्या मनात आहे. स्वामी मात्र त्याला स्त्रीच्या अंतरंगात दडलेल्या देवीशक्तीची जाणीव करून देतात.
"तू विसरतो आहेस... नवरात्र येत आहे!" असा इशारा स्वामी देतात आणि तो रणजीतला हादरवून सोडतो. ज्यांना तो आतापर्यंत दुर्बल समजत आला, त्याच स्त्रिया आता त्याच्याविरोधात उभ्या राहणार आहेत.
चारही स्त्रियांना नामोहरम करण्यासाठी रणजीत आपली सगळी ताकद पणाला लावणार आहे. धमक्या, दबाव, हल्ले आणि सत्तेचा गैरवापर करून तो त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करेल. पण प्रत्येक संकटात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
नवरात्रीच्या या विशेष पर्वात चार पीडित स्त्रियांचा प्रवास दुःखातून संघर्षाकडे आणि संघर्षातून आत्मसामर्थ्याकडे होताना दिसेल. या प्रवासाची परिणती विजयादशमीच्या सीमोल्लंघनात होणार आहे.
या चौघींमध्ये दडलेली शक्ती नेमकी कशी जागी होणार, त्या रणजीतच्या अत्याचारांना कशा सामोऱ्या जाणार आणि या संघर्षात स्वामींची लीला त्यांना कुठपर्यंत घेऊन जाणार, या प्रश्नांची उत्तरं 'जागर शक्तीचा - महिमा स्वामींचा' या भागांमध्ये मिळतील. हे पर्व केवळ चार स्त्रियांच्या संघर्षाची कथा नसून, स्त्रीच्या आत्मसन्मानाची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या सामर्थ्याची गोष्ट मांडणार आहे.