वाशी मनपा रुग्णालयात बाळ मृत जन्मल्याने गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात प्रसूतीनंतर बाळ मृत अवस्थेत जन्मल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यूवरून मोठा गोंधळ झाला. प्रसूतीनंतर बाळ मृत अवस्थेत जन्मल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मिलन दास यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर १ ऑक्टोबर रोजी वाशी मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही त्यांची पहिलीच प्रसूती होती.
४ ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी सुरुवातीला सामान्य प्रसूतीचा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही प्रसूती यशस्वी झाली नाही, म्हणून अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर बाळाचा जन्म झाला. पण बाळ मृत असल्याचे आढळून आले. त्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला. संबंधित डॉक्टर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, असेही कुटुंबीयांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांच्या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांच्या माहितीनुसार, बाळाचा गर्भातच दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टर रुग्णासोबतच होते आणि उपचारादरम्यान त्यांनी रुग्णाला सोडून कुठेही पळ काढला नाही, असा खुलासा प्रशासनाने केला आहे.
म्हणजेच एकीकडे कुटुंबीय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासन बाळाचा मृत्यू गर्भातच झाल्याचे सांगत आहे. दोघांचे म्हणणे वेगवेगळे आहे. बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.