फक्त डिग्री पुरेशी नाही, पहिली नोकरी मिळवण्यासाठी या 10 स्किल्स शिका
कॉलेजची पदवी हातात आली की चांगली नोकरी मिळेल असे अनेक विद्यार्थ्यांना वाटते, पण कॉर्पोरेट क्षेत्रात शैक्षणिक पात्रतेइतकेच प्रत्यक्ष कामाची कौशल्येही महत्त्वाची ठरतात.
कॉलेजमधून पदवी घेतली की आपोआप चांगली नोकरी मिळेल, असा समज अनेक विद्यार्थ्यांचा असतो. पण आजच्या कॉर्पोरेट जगात परिस्थिती वेगळी आहे. इथे फक्त शैक्षणिक पात्रता बघितली जात नाही, तर प्रत्यक्ष कामासाठी लागणारी कौशल्येही तितकीच महत्त्वाची मानली जातात. कंपन्यांना अभ्यासात हुशार असणारा उमेदवार हवा असतोच, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा, समस्या सोडवणारा आणि टीमसोबत नीट काम करणारा माणूस हवा असतो. पहिली नोकरी मिळवण्याआधी नेमकी कोणती कौशल्ये शिकायला हवीत, याची यादी पुढे दिली आहे.
सगळ्यात आधी येते ती AI आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीची जाण. जनरेटिव्ह AI आणि इतर डिजिटल टूल्स जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने वापरता येणे आज उपयोगाचे ठरत आहे. कंटेंट लिहिणे, डेटाचे विश्लेषण करणे, रिसर्च करणे, कोडिंग किंवा रोजची कामे यात AI मदतनीस म्हणून वापरता येतो. पण AI ने दिलेली माहिती खरी आहे का, हे पडताळून बघण्याची सवयही तितकीच गरजेची आहे.
दुसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन. आपले म्हणणे स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत मांडता आले पाहिजे. ई-मेल लिहिणे, प्रेझेंटेशन देणे, क्लायंटशी बोलणे आणि समोरच्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकणे या गोष्टी जवळपास प्रत्येक क्षेत्रात कामाला येतात.
तिसरे कौशल्य आहे सॅलरी आणि बजेट मॅनेजमेंट. पहिल्या पगारापासूनच उत्पन्न आणि खर्च यांचे नियोजन करायची सवय लावली, तर पुढे फायदा होतो. गरजेचे खर्च, बचत आणि स्वतःची उद्दिष्टे यांच्यासाठी पैसे कसे राखून ठेवायचे, हे ठरवल्याने आर्थिक शिस्त तयार होते.
चौथ्या क्रमांकावर पर्सनल फायनान्सचा मुद्दा येतो. बचत, महागाई, चक्रवाढ व्याज, विमा, आपत्कालीन निधी आणि गुंतवणूक यांची मूलभूत माहिती तरुणांनी करून घेतली पाहिजे. म्युच्युअल फंड, SIP किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्याआधी त्यातली जोखीम समजून घेणेही आवश्यक आहे.
पाचवे कौशल्य म्हणजे स्वतःहून पुढाकार घेणे. ऑफिसमध्ये प्रत्येक कामासाठी वरिष्ठांच्या सूचनांची वाट न बघता, जबाबदारी स्वतःहून उचलणे, अडचण नेमकी काय आहे हे ओळखणे आणि त्यावर उपाय सुचवणे या गोष्टी करिअरसाठी फायद्याच्या ठरतात.
सहावे कौशल्य आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि क्रिटिकल थिंकिंग. एखादी समस्या समोर आली की तिचे मूळ कारण शोधणे, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करणे आणि व्यवहार्य पर्याय निवडणे गरजेचे असते. कंपन्यांसाठी समस्या ओळखण्याइतकेच तिच्यावर उपाय शोधणारा कर्मचारी महत्त्वाचा असतो.
सातवे कौशल्य म्हणजे स्ट्रेस आणि टाइम मॅनेजमेंट. एकाच वेळी अनेक कामे आणि डेडलाईन्स सांभाळायच्या असतात, तेव्हा कोणत्या कामाला आधी हात घालायचा, वेळ कसा वाटून घ्यायचा आणि दबावाच्या स्थितीत निर्णय कसा घ्यायचा, हे शिकणे गरजेचे आहे.
आठवे कौशल्य आहे डिजिटल सॅव्हीनेस आणि रिसर्च. फक्त इंटरनेटवर सर्च करता येणे म्हणजे डिजिटल कौशल्य नाही. कोणता स्रोत विश्वासार्ह आहे हे ओळखणे, माहितीची पडताळणी करणे आणि Excel, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारखी कामाशी संबंधित डिजिटल टूल्स हाताळता येणे महत्त्वाचे ठरते.
नववे कौशल्य म्हणजे टीमवर्क आणि कोलॅबोरेशन. कॉर्पोरेट क्षेत्रात बहुतेक काम टीमच्या माध्यमातूनच होते. वेगवेगळा विचार असणाऱ्या लोकांबरोबर काम करणे, मतभेद व्यावसायिक पद्धतीने हाताळणे, जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि सामूहिक उद्दिष्टासाठी योगदान देणे गरजेचे असते.
आणि दहावे म्हणजे सतत शिकत राहण्याची तयारी. तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजा सतत बदलत असल्याने पदवी मिळाल्यावरही शिक्षण थांबत नाही. नवीन टूल्स, नवी कौशल्ये आणि आपल्या क्षेत्रातले बदल शिकत राहण्याची वृत्ती दीर्घकालीन करिअरसाठी महत्त्वाची ठरते.