बालविवाहाचे समर्थन केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानी इमामला इटलीतून हद्दपार केले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गुप्त कॅमेऱ्यातील विधानांनंतर २५ वर्षांचे इमाम अली काशिफ यांना मालपेन्सा विमानतळावरून पाकिस्तानला पाठवण्यात आले.
बालविवाहाचे समर्थन केल्याच्या आरोपावरून इटली सरकारने एका पाकिस्तानी इमामवर कडक कारवाई केली आहे. अली काशिफ हे २५ वर्षांचे पाकिस्तानी इमाम असून त्यांना इटलीतून हद्दपार करण्यात आले आहे. एका गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी नऊ वर्षांच्या मुलींच्या लग्नाचे समर्थन केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाची सुरुवात २५ जानेवारी २०२६ रोजी प्रसारित झालेल्या Fuori dal Coro या इटालियन दूरचित्रवाणी कार्यक्रमातून झाली. कार्यक्रमातल्या एका पत्रकाराने आपण इस्लाम धर्माची माहिती घ्यायला उत्सुक असलेला विद्यार्थी आहोत, असे भासवले होते. त्यानंतर ब्रेशिया शहरातल्या दोन इस्लामिक केंद्रांमध्ये गुप्त कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यात आले.
पत्रकार आणि काशिफ यांची चर्चा सुरू असताना काशिफ यांनी अशी भूमिका मांडली की, मुलगी पहिल्या मासिक पाळीनंतर प्रौढ मानली जाऊ शकते आणि तिचे लग्न होऊ शकते. नऊ वर्षांच्या मुलीशी लग्नाचे समर्थन करणारी त्यांची ही विधाने सगळीकडे पसरल्यानंतर इटलीत खूपच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली, तेव्हा स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली.
अली काशिफ गेली सहा वर्षे इटलीत राहत होते. ब्रेशिया शहरातल्या त्या दोन इस्लामिक केंद्रांमध्ये ते अधूनमधून इमाम म्हणून धार्मिक मार्गदर्शन करत होते. टीव्हीवरच्या स्टिंग ऑपरेशननंतर त्यांच्या विधानांची चौकशी सुरू करण्यात आली. ब्रेशियाचे पोलीस प्रमुख पाओलो सार्तोरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. काशिफ यांच्या बोलण्याचा, त्यांच्या विचारसरणीचा आणि सामाजिक सुरक्षिततेचा या दृष्टीने विचार करण्यात आला. त्यांच्या घराची परवानगी रद्द करण्यात आली आणि त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
इटालियन अधिकाऱ्यांनी अली काशिफ यांना ताब्यात घेऊन मिलानमधल्या मालपेन्सा विमानतळावर नेले. तिथून त्यांना बँकॉकमार्गे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला जाणाऱ्या विमानात बसवण्यात आले. या कारवाईनंतर त्यांना इटलीतून हद्दपार करण्यात आले.
या सगळ्या प्रकारामुळे इटलीत बालविवाह, धार्मिक शिकवण आणि स्थलांतरितांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच महिन्यात इटलीत सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इटलीत मुस्लिम आणि बिगर मुस्लिम यांच्यात वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
अल्पवयीन मुलांचे संरक्षण आणि देशातल्या कायद्यांचे पालन या मुद्द्यांवर इटालियन प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.