सोमवार, 2 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

फखर जमानच्या १२६ धावा; श्रीलंकेला हरवून पाकिस्तानने जिंकली ट्राय सीरीज, भारताच्या विक्रमाशी बरोबरी

फखर जमानच्या १२६ धावा; श्रीलंकेला हरवून पाकिस्तानने जिंकली ट्राय सीरीज, भारताच्या विक्रमाशी बरोबरी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
खेळ PT24 टीम

लाहोरमधील अंतिम सामन्यात पाकिस्तानने ३२६ धावांचे लक्ष्य गाठून श्रीलंकेवर ३ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पुरुषांच्या एकदिवसीय अंतिम सामन्यातील सर्वात मोठ्या पाठलागाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका या तीन संघांमध्ये एक ट्राय सीरीज खेळली गेली. पाकिस्तानात झालेल्या या मालिकेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. मात्र निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकला नाही. अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून ट्राय सीरीजचे विजेतेपद पटकावले आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना ३१ ऑक्टोबर रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट कामगिरी केली आणि विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून ट्रॉफी जिंकली. या विजयामुळे पाकिस्तानने भारतीय संघाच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.

श्रीलंकेने आधी फलंदाजी केली. कामिंदू मेंडिसने शानदार फलंदाजी करत १२८ चेंडूंत १३१ धावा केल्या. पवन रत्नायकेने ७७ धावा केल्या, तर अविष्का फर्नांडोने ३८ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला ५० षटकांत ८ विकेट्स गमावून ३२५ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि सलमान अली आगा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानला विजयासाठी ३२६ धावांची गरज होती, पण त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या १४ धावांत त्यांचे दोन विकेट्स गेले. त्यानंतर फखर जमान आणि साद बेग यांनी शानदार भागीदारी केली. साद बेगने ७५ चेंडूंत ७४ धावा केल्या, तर फखर जमानने ९९ चेंडूंत १२६ धावांची शानदार खेळी केली.

खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या अराफत मिन्हासने ३१ चेंडूंत धडाकेबाज ६१ धावा केल्या, तर हसन नवाझने ३७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानने ४८.३ षटकांत ३२६ धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला. पाकिस्तानने श्रीलंकेवर ३ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने २०२६ च्या ट्राय सीरीजचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी आपल्या नावावर केली.

१३ जुलै २००२ रोजी भारताने नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अत्यंत ऐतिहासिक विजय आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या त्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ३२६ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडला हरवले. त्या सामन्यात युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी एक अविस्मरणीय भागीदारी केली होती.

पुरुषांच्या एकदिवसीय अंतिम सामन्यातील तो आतापर्यंतचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता. श्रीलंकेविरुद्ध ३२६ धावांचे लक्ष्य पूर्ण करून पाकिस्तानने भारताच्या त्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे पुरुषांच्या एकदिवसीय अंतिम सामन्यातील सर्वात मोठ्या धावांच्या पाठलागाचा संयुक्त विक्रम आता पाकिस्तान आणि भारत या दोघांच्या नावावर आहे.

#नागपूर#खेल#PT24#Sports#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ