विल जॅक्सशी वाद: पाकिस्तानच्या हारिस रऊफला सामना शुल्काच्या २०% दंड
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विल जॅक्सशी भिडल्याने हारिस रऊफवर आयसीसीने दंड आणि एक डिमेरिट पॉइंटची कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफ याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे. इंग्लंडचा विल जॅक्स याच्याशी मैदानात झालेला वाद रऊफला चांगलाच महागात पडला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात २५ ऑक्टोबर रोजी त्रिकोणीय एकदिवसीय मालिकेतला एक रोमांचक सामना खेळला गेला, आणि ही सगळी घटना त्याच सामन्यातली आहे.
आयसीसीने रऊफला आचारसंहितेच्या लेव्हल १ च्या उल्लंघनासाठी दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्याच्या सामना शुल्कातून २०% रक्कम दंड म्हणून कापली जाणार आहे. रऊफने आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चा भंग केला आहे. हे कलम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या वर्तनाशी संबंधित आहे.
दंडासोबतच रऊफला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतलं हे त्याचं तिसरं उल्लंघन आहे, आणि त्यामुळे त्याच्या एकूण उल्लंघनांची संख्या आता पाच झाली आहे.
आता नेमकं काय झालं ते पाहू. पाकिस्तानच्या डावातल्या ४६ व्या षटकात रऊफ नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा होता. तिथून त्याने वाईडसाठी अपील केलं. त्यानंतर त्याचा आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स यांचा वाद सुरू झाला. पंच शरफुद-उद-दौला इब्ने शाहिद यांनी त्याला इशारा दिला, तरीही रऊफने आपली बॅट उंचावली आणि वाद तसाच चालू ठेवला. मग तो पंचांपासून बाजूला होऊन जॅक्सच्या दिशेने गेला. या वागण्यामुळे त्याच्या सामना शुल्कातून २०% कपात करण्यात आली आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला.
दंड फक्त पाकिस्तानच्या खेळाडूलाच झाला असं नाही. सामन्यादरम्यान इंग्लंड संघाकडूनही एक मोठी चूक झाली, आणि त्यामुळे त्यांनाही सामना शुल्काचा दंड भरावा लागला. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, एखादा संघ ठरलेल्या वेळेत आपली षटकं पूर्ण करू शकला नाही, तर प्रत्येक षटकासाठी दंड आकारला जातो. इंग्लंडचा संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटकं मागे होता, म्हणून त्यांना १५% दंड झाला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यांनी ही चूक कबूल केली, त्यामुळे या प्रकरणात आता कोणतीही सुनावणी होणार नाही.
आता सामन्याच्या निकालाकडे येऊ. २५ ऑक्टोबरचा हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पाकिस्तानसमोर २४२ धावांचं लक्ष्य ठेवलं. पाकिस्तानने १५४ धावांत ९ विकेट्स गमावल्या होत्या. इंग्लंडचा विजय निश्चित होता, पण शादाब खानने एक शानदार खेळी केली. त्याने नाबाद ११३ धावा करून आपल्या संघाला फक्त १ विकेट राखून विजय मिळवून दिला. म्हणजेच पाकिस्तानने हा सामना एका विकेटने जिंकला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.