Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; 'धाकट्या सुनबाई'ची झी मराठीवर एंट्री, 'या'
नाती, आपलेपणा, प्रेम आणि माणुसकी या भावनांभोवती गुंफलेली 'धाकट्या सुनबाई' ही नवी मालिका झी मराठीवर लवकरच सुरू होणार आहे. दोन वेगळ्या विचारसरणीच्या कुटुंबांची आणि त्यांच्यातील नात्यांच्या गुंतागुंतीची गोष्ट या मालिकेतून मांडली जाणार आहे. या दोन कुटुंबांचे विचार वेगळे असले तरी त्यांच्यातील नाती कशी उलगडत जातात, हे मालिकेत टप्प्याटप्प्याने दाखवलं जाणार आहे. २८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ६:३० वाजता ही मालिका पाहता येणार आहे.
या मालिकेच्या केंद्रस्थानी राधिका आणि वेदांत ही दोन पात्रं आहेत. आपल्या माणसांची सोबत आणि नात्यांमधला विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, हे या दोघांच्या प्रवासातून उलगडणार आहे. दोघांची पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी असली तरी त्यांच्या आयुष्यात एकमेकांच्या येण्यामुळे नव्याने अनेक प्रश्न उभे राहतात, आणि त्यातूनच ही कथा पुढे सरकते.
राधिका लहानपणी कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर सापडली होती. आप्पा आणि निर्मला यांनी तिला दत्तक घेतलं आणि कृष्णाचा प्रसाद मानून स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. सालस, मनमिळाऊ आणि उत्साही स्वभावाची राधिका नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाते. मात्र घरातील गोदाक्का आजही तिला 'परकी' समजतात. त्यामुळे घरात प्रेम मिळत असूनही आपल्या खऱ्या घराचा आणि आपल्या माणसांचा शोध राधिकेच्या मनात कायम असतो. आपलं मन मोकळं करण्यासाठी ती कृष्णाशी बोलते आणि त्यालाच आपला सखा मानते. आप्पा आणि निर्मलांकडून मिळणारं प्रेम आणि गोदाक्कांकडून होणारा 'परकी' असल्याचा अनुभव, या दोन्ही गोष्टींमध्ये राधिकेचं मन सतत हेलकावे खात असतं.
दुसरीकडे पटवर्धन कुटुंबातील वेदांत आहे. पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीचा व्यवसाय करणाऱ्या 'आराधना' या कंपनीचा तो वारसदार आहे. हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार असलेला वेदांत आपल्या कुटुंबाच्या परंपरांना खूप महत्त्व देतो. आई दमयंतीच्या शिस्तीत आणि विचारांमध्ये वाढलेल्या वेदांतच्या आयुष्यात राधिकेची एंट्री झाल्यावर मात्र एक नवा प्रश्न उभा राहतो - माणसाची ओळख त्याच्या रक्तानं आणि कुळानं ठरते की त्याच्या मनानं? राधिकेमुळे वेदांतचा स्वतःच्या विचारांकडे नव्या नजरेनं बघण्याचा प्रवास सुरू होतो. आजवर कुटुंबाच्या परंपरा आणि आईच्या शिकवणीतच वाढलेल्या वेदांतसमोर राधिकेमुळे पहिल्यांदाच वेगळा विचार उभा राहतो, आणि तोच या मालिकेतील मुख्य गुंतागुंतीचा भाग ठरतो.
अभिनेत्री चिन्मयी मोरे या मालिकेत राधिकाची भूमिका साकारत आहे, तर अभिनेता मंदार जाधव वेदांतच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही कुटुंबांमधील नात्यांतून प्रेम, आपलेपणा, विश्वास आणि माणुसकीचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
नाती आणि माणुसकी हा गाभा असलेली 'धाकट्या सुनबाई' ही मालिका २८ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ६:३० वाजता झी मराठीवर पाहता येईल.