मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचा ट्रेंड का वाढतोय? शरीर आणि त्वचेसाठी काय फायदे, कोणी काळजी घ्यावी
दिवसभराच्या दगदगीनंतर अनेक जण रात्री झोपण्याआधी अंघोळ करतात आणि त्यात मीठ घालण्याची पद्धत अनेक घरांत रूढ आहे. मीठाच्या पाण्याने खरंच काय फायदा होतो आणि कोणी ही अंघोळ टाळावी, याबद्दल हे वृत्त.
दिवसभर काम करून, धावपळ करून शरीर थकतं आणि त्या थकव्यानंतर शरीराला विश्रांतीची फार गरज असते. रात्रीच्या वेळी शांत झोप लागावी यासाठी अनेक जण झोपण्याआधी अंघोळ करतात. अंघोळीमुळे दिवसभर शरीरावर साचून राहिलेला घामाचा थर आणि चिकटपणा कमी होऊन शरीर स्वच्छ होतं. काहींना गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते, तर काहींना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडतं. या दोन्ही सवयींव्यतिरिक्त पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणं ही अनेक घरांत रूढ असलेली पद्धत आहे. काही जण शरीराला आराम मिळावा, थकवा कमी व्हावा किंवा त्वचेची स्वच्छता राखली जावी यासाठी ही पद्धत वापरतात.
कोमट पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातल्या स्नायूंना आराम मिळू शकतो, आणि त्या पाण्यात मीठ घातल्यावर काहींना ही अंघोळ अधिक सुखद वाटते. पण स्नायू दुखणं किंवा थकवा यावर मीठाच्या पाण्याचा नेमका आणि स्वतंत्र काय परिणाम होतो, याचे ठोस पुरावे मर्यादित आहेत. म्हणजे आराम वाटण्यामागे बरेचदा फक्त मीठ नव्हे, तर कोमट पाणी आणि त्यासोबत मिळणारी विश्रांती यांचाच मोठा वाटा असू शकतो.
काही प्रकारच्या मिठाच्या आंघोळीमुळे त्वचेवरचा मृत पेशींचा आणि खरखरीत थर मऊ व्हायला मदत होऊ शकते. काही खनिजयुक्त स्नानपद्धतींचा त्वचेच्या ठराविक समस्यांवर अभ्यासही झाला आहे. पण याचा अर्थ असा घेता येणार नाही की साध्या घरगुती मिठाच्या पाण्याने सगळ्या प्रकारच्या त्वचारोगांवर उपचार होतात. हा फरक समजून घेणं गरजेचं आहे, कारण अभ्यास झालेल्या खनिजयुक्त स्नानपद्धती आणि घरी नुसतं मीठ घालून केलेली अंघोळ, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
सोरायसिस किंवा काही प्रकारच्या खाजेसारख्या ठराविक त्वचारोगांत डॉक्टरांच्या सल्ल्याने मिठाच्या स्नानाचा वापर केला जातो. अशा वैद्यकीय उपचारांत मिठाचा प्रकार, पाण्यातलं त्याचं प्रमाण आणि त्यासोबत दिल्या जाणाऱ्या इतर उपचारपद्धती या गोष्टींना महत्त्व असतं. त्यामुळे घरच्या घरी नुसतं मीठ घालून अंघोळ केल्याने त्वचारोग बरा होईल, असा दावा योग्य ठरणार नाही.
कोमट पाण्यात काही वेळ बसल्याने किंवा अंघोळ केल्याने मनाला शांत वाटू शकतं आणि दिवसभराचा थकवा उतरल्यासारखं वाटू शकतं. मात्र हा परिणाम मुख्यतः विश्रांती आणि आरामाशी संबंधित असतो. मीठामुळे मानसिक ताण किंवा चिंता कमी होते, हे अजून ठोसपणे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मन शांत होतं असं जरी वाटत असलं, तरी त्यामागे मीठाचा स्वतंत्र परिणाम आहे असं ठामपणे म्हणता येणार नाही.
ज्यांना एक्झिमा, अतिसंवेदनशील त्वचा, उघड्या जखमा, त्वचेचा संसर्ग किंवा मधुमेहामुळे पायांच्या त्वचेच्या समस्या आहेत, त्यांनी मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंघोळीनंतर त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा खाज वाढल्यास ही अंघोळ लगेच बंद करावी.