बनावट चावीने कार उघडून ५० लाखांची रोकड लंपास; दोघे आठ तासांत जेरबंद
पुनावळे येथे उभ्या कारमधून ५० लाख रुपये चोरीस गेले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोघांना अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड बनावट चावीच्या मदतीने चोरून नेणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्त कारवाई करून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरच्या सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर एक कार उभी करण्यात आली होती. बनावट चावीने कारचे दरवाजे उघडून आतमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्याने नेली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना तातडीने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर विविध पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती बनावट चावीने कार उघडून ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसले. पुढील तपासात फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले याच्यावर संशय बळावला.
बेंडाले याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मित्राला कारची बनावट चावी दिली, कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती दिली आणि चोरी करण्यास सांगितले, असे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, बांधकाम व्यवसाय, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनेही तपास करण्यात आला.