परदेशी नवरदेवाचा बनाव करून महिलेला २० लाखांना गंडा, नागपुरात सात जणांना अटक
लग्नाचे आमिष दाखवून आणि कस्टममध्ये सोने-डॉलर अडकल्याची खोटी गोष्ट सांगून महिलेकडून सुमारे २० लाख रुपये उकळणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा क्राइम ब्रँचने पर्दाफाश केला.
परदेशी नवरदेव असल्याचे भासवून लग्नाचे आमिष दाखवल्याचा आणि कस्टममध्ये सोने-डॉलर अडकल्याची गोष्ट रचून एका महिलेकडून सुमारे २० लाख रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर क्राइम ब्रँचने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्यांकडून कार, दुचाकी वाहन, मोबाइल आणि रोख रकमेसह एकूण १८.४५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी नागपूरमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर फसवणुकीचे जाळे चालवत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींचा दुबईतील हवाला व्यवहाराशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये जेयष अमृत ठाकुर (२०), यशपाल आम सिंह चौहान (२४), कुलदीप सिंह विक्रम जडेजा (२६), राजेंद्र सिंह राणा वाघेला (३४), नरपत बाबू सिंह (२७), उपेंद्र नागजी जोशी (२८) आणि भानु सिंह जसवंत सिंह वाघेला (२९) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी गुजरातमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांतले राहणारे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला आधी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. बोलता बोलता त्याने महिलेशी ओळख वाढवली आणि परदेशात आपला मोठा व्यवसाय असल्याचे सांगितले. भारतात येऊन महिलेशी लग्न करून इथेच स्थायिक होण्याची इच्छा असल्याचेही त्याने बोलून दाखवले.
आपला सोन्याचा व्यवसाय आहे आणि ब्रिटनमध्ये कपड्यांचा मॉल आहे, अशी गोष्ट सांगून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भारतात येताना आपण ७० तोळे सोने आणि ७०,००० अमेरिकी डॉलर घेऊन येत असल्याचे त्याने सांगितले. काही काळाने त्याने महिलेला फोन करून दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी आपल्याला पकडल्याचे सांगितले.
सोने आणि डॉलर सोडवण्यासाठी १३.९२ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने ही रक्कम ट्रान्सफर केली. सुमारे २० लाख रुपये उकळल्यानंतरही आरोपी आणखी पैशांची मागणी करत राहिले, तेव्हा महिलेला संशय आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलीस आणि युनिट ३ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. आरोपींचे मोबाइल आणि पैशांच्या व्यवहारांतून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. आरोपी तक्रारदार महिलेला पुन्हा जाळ्यात ओढून पैसे उकळण्याच्या तयारीत होते, असे पोलिसांनी सांगितले.
त्याच दरम्यान पोलिसांनी तक्रारदाराच्या मदतीने सापळा रचला आणि सातही आरोपींना पकडले. चौकशीत आरोपी नागपूरमधून आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फसवणुकीचे रॅकेट चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या नेटवर्कचे धागे दुबईतील हवाला व्यवहाराशी जोडलेले आहेत की नाही, याचा शोध पोलीस आता घेत आहेत. आरोपींची बँक खाती, मोबाइल फोन आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी सुरू आहे.
सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर अतुल मोहनकर, पीएसआय अमोल देशमुख, मधुकर काठोके, विवेक झिंगरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.