नागपुरात सायबर भामट्यांनी तीन ज्येष्ठ नागरिकांना ६० लाख ७३ हजारांना गंडवले
पेन्शन कार्ड, रेल्वे पेन्शन सुधारणा आणि जुनी नाणी-नोटा बदलून देण्याच्या आमिषाने नागपुरातील तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली. सायबर पोलिसांनी तिन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपूर शहरात सायबर फसवणुकीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून सायबर भामट्यांनी तीन ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढलं. पेन्शन कार्ड बनवून देतो, रेल्वेतील पेन्शन दुरुस्त करून देतो आणि जुनी नोटा-नाणी बदलून मोठी रक्कम मिळवून देतो, असं आमिष दाखवत आरोपींनी तिघांकडून मिळून एकूण ६० लाख ७३ हजार रुपये उकळले. तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी तिन्ही प्रकरणात गुन्हे दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
पहिली घटना अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. पीडब्ल्यूडीमधून निवृत्त झालेले राजेश वाघमारे (वय ६०) यांना १६ सप्टेंबरला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. पेन्शन कार्ड बनवून देतो असं सांगत आरोपीने वाघमारे यांना एक लिंक पाठवली आणि त्यात बँक व डेबिट कार्डाशी संबंधित माहिती भरायला सांगितलं. लिंकवर माहिती भरताच त्यांच्या बँक खात्यातून विनापरवानगी ५ लाख ४९ हजार रुपये काढले गेले. फसवणूक लक्षात येताच वाघमारे यांनी पोलिसांत तक्रार दिली.
दुसरी घटना रामेश्वरी रिंग रोड परिसरात राहणाऱ्या रेल्वेतील निवृत्त कर्मचारी विजय ढबरे (वय ६१) यांच्यासोबत घडली. आरोपीने स्वतःचं नाव धर्मेंद्र यादव सांगून तो स्वतःला मंडळ रेल्वे व्यवस्थापक असल्याचं भासवत होता. त्याने ढबरे यांना पेन्शन दुरुस्त करून देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅपवरून बनावट कागदपत्रं पाठवली आणि फॉर्म भरण्याच्या बहाण्याने बँक खातं, एटीएम कार्ड आणि सीव्हीव्हीची माहिती मिळवली. ही माहिती हाती लागताच आरोपींनी बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रातील खात्यांमधून एकूण ३१ लाख ९७ हजार रुपये काढून घेतले.
तिसरी घटना अभ्यंकर नगरमध्ये राहणारे पिलाजी विठोबा सोमकुंवर (वय ६६) यांच्याबाबत घडली. जुनी नोटा-नाणी बदलल्यास ५५ लाख २१ हजार रुपये मिळतील, असं आमिष भामट्यांनी त्यांना दाखवलं. यासाठी आरोपींनी 'ओल्ड क्वाइन ओनर १७' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमार्फत त्यांच्याशी संपर्क साधला होता. सरकारी कर, विमा आणि स्टँप शुल्काच्या नावाखाली बनावट कागदपत्रं तयार करून भामट्यांनी सोमकुंवर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या शुल्काच्या बहाण्याने त्यांच्याकडून आरटीजीएसद्वारे विविध बँक खात्यांमध्ये २३ लाख २६ हजार रुपये ट्रान्सफर करवून घेतले.
तिन्ही प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी वापरलेले मोबाइल नंबर, बँक खाती आणि ऑनलाइन व्यवहारांची तांत्रिक तपासणी पोलीस करत आहेत. या सर्व घटनांमागे एकच टोळी आहे की वेगवेगळे सायबर भामटे सक्रिय आहेत, हे शोधण्याचा प्रयत्न सायबर पोलीस करत आहेत.