दिवाळीत घर रंगवताय? वास्तुशास्त्रानुसार खोली आणि दिशेप्रमाणे कोणते रंग शुभ ते पाहा
दिवाळीआधी घराला नवा रंग देताना हॉल, किचन, बेडरूम आणि बाथरूमसाठी तसेच प्रत्येक दिशेसाठी वास्तुशास्त्र कोणते रंग सुचवते, ते जाणून घ्या.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळी जवळ आली की आपलं घर एकदम चकाचक दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणून अनेक जण या काळात भिंतींना नवा रंग देतात. पण रंग फक्त दिसायला छान असावा एवढाच विषय नसतो. त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि घरातल्या वातावरणावरही होतो. वास्तुशास्त्रात तर रंगाला खूप महत्त्व दिलं आहे. चुकीचा रंग लावला तर घराचा सगळा लुकच बिघडतो. त्यामुळे कोणत्या खोलीला कोणता रंग द्यायचा आणि कोणता रंग शुभ किंवा अशुभ मानला जातो, हे आधी समजून घ्यायला हवं.
हॉलमध्ये आपण दिवसभरातला जास्त वेळ घालवतो आणि पाहुणे आले तरी तिथेच बसतात. म्हणून इथला रंग असा असावा की पाहताक्षणी प्रसन्न वाटेल. जास्त गडद किंवा भडक रंग हॉलमध्ये अजिबात लावू नयेत. पांढरा, दुधासारखा क्रीम, हलका तपकिरी आणि फिकट गुलाबी हे चार रंग हॉलसाठी एकदम योग्य आहेत. यामुळे खोली मोठी वाटते आणि शांतता राहते. भिंतीला असा रंग दिला तर पडदे आणि कुशनही त्याच रंगाच्या छटेत घ्या, मग घर अगदी रिच दिसेल.
किचनमध्ये स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची असते. वास्तूच्या मते किचनसाठी पांढऱ्या रंगापेक्षा चांगला रंग नाही, कारण पांढरा रंग शांतता आणि साफसफाईचं प्रतीक आहे. पांढऱ्या रंगामुळे लहान किचनसुद्धा मोठं वाटतं. मात्र पांढऱ्या रंगावर डाग लगेच दिसतात.
दिवसभराच्या थकव्यानंतर आराम करायची खोली म्हणजे बेडरूम. इथे शांत झोप लागावी म्हणून जास्त भडक रंग लावू नयेत. आकाशी निळा, हलका हिरवा, गुलाबी आणि क्रीम या छटा बेडरूमसाठी उत्तम सांगितल्या आहेत. हे सगळे रंग थंड असल्यामुळे मन शांत राहतं, तसेच नवरा-बायकोमधले वाद कमी होऊन प्रेम वाढतं. म्हणूनच इथे फिकट रंग निवडावेत.
बाथरूमसाठी विशेषतः सफेद किंवा गुलाबी रंग लावावा. सफेद रंगामुळे स्वच्छता राहते, तर गुलाबी रंगामुळे वेगळा फ्रेशनेस जाणवतो. दोन्ही रंगांमुळे बाथरूमला एक वेगळा लूकही येतो.
आता दिशेनुसार रंग कसा निवडायचा ते पाहू. घराची प्रत्येक दिशा वेगळी असते आणि प्रत्येक दिशेला वेगळा रंग सूट होतो. उत्तरेच्या भिंतीला हिरवा रंग लावा. हिरवा म्हणजे झाडं, वाढ आणि पैसा. या दिशेला हिरवा लावल्याने घरात बरकत येते आणि धंद्यात फायदा होतो, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. दक्षिणेकडे लाल रंग लावा. लाल म्हणजे ताकद आणि एनर्जी. दक्षिणेला लाल रंग असेल त्या घरात उत्साह वाढतो आणि नात्यांमध्ये गोडवा राहतो.
पूर्वेकडे पांढरा आणि पश्चिमेकडे निळा रंग शुभ मानला जातो. पूर्वेला सूर्योदय होतो, तर पश्चिमेला निळा रंग लावल्याने मन स्थिर होतं आणि शांतता मिळते. घरातला सगळ्यात महत्त्वाचा कोपरा ईशान्येकडचा मानला जातो, कारण या जागेला देवाची जागा म्हणतात. इथे पिवळा किंवा केशरी रंग लावा. पिवळा म्हणजे बुद्धी आणि केशरी म्हणजे नवी उमेद. या रंगांमुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं. तर मित्रांनो, या दिवाळीत असाच विचार करून रंग निवडा.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.