सुट्ट्यांबद्दल विचारल्याने नागपुरात दोन मुलांना शाळेबाहेर ठेवले; चौकशीत यु-डायस नोंदणीच नाही
नागपुरातील श्री चैतन्य टेक्नो स्कूलने पालकाच्या प्रश्नावरून दोन्ही मुलांना शाळेत घेतले नसल्याचा आरोप आहे. चौकशीत शाळेकडे यु-डायस नोंदणी नसल्याचे समोर आले.
शाळेला एवढ्या सुट्ट्या का, असा प्रश्न विचारला म्हणून नागपुरातील एका खाजगी शाळेने पालकाच्या दोन्ही मुलांना शाळेबाहेर ठेवल्याचा आरोप आहे. श्री चैतन्य टेक्नो स्कूलबाबतच्या या प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बेसा परिसरात राहणारे विवेक सूर्यवंशी 30 सप्टेंबर रोजी आपल्या दोन्ही मुलांना शाळेत सोडायला गेले होते. तिथे रिसेप्शनवरच्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारले की विद्यार्थ्यांना वारंवार सुट्ट्या का दिल्या जातात. त्यांना नीट उत्तर मिळाले नाही. उलट शाळेतल्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ शूटिंग सुरू केले आणि सूर्यवंशी व कर्मचाऱ्यांमध्ये थोडा शाब्दिक वाद झाला.
त्यानंतर सूर्यवंशी घरी परतले आणि कामाला गेले. दुपारी शाळेतून त्यांना फोन आला. रिसेप्शनवरच्या महिला कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे का बोलले, तुमचे वागणे योग्य नाही, असे त्यांना सुनावण्यात आले आणि मुलांना घेऊन जायला सांगितले गेले.
सूर्यवंशी शाळेत पोहोचले, तेव्हा व्यवस्थापनाने त्यांना शाळेत येण्यास मज्जाव केला, तसेच पुढील सूचनेपर्यंत मुलांनाही शाळेत येण्यास बंदी असल्याचे सांगितले, असा त्यांचा आरोप आहे. कारवाईमागचे कारण विचारण्यासाठी त्यांनी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शेवटी त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि महिला व बालविकास विभागाच्या बाल संरक्षण हेल्पलाइनवरही तक्रार नोंदवली.
पालकांचा आरोप असा आहे की त्या दिवशीची परीक्षाही मुलांना देऊ दिली नाही. दुसऱ्या दिवशीही शाळेने दोघांना आत घेतले नाही. शाळेच्या या वागण्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांची मनस्थिती आणि तब्येत बिघडल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
सूर्यवंशी कुटुंबाने शाळेला काही प्रश्न विचारले आहेत. आमच्या बोलण्याची आणि प्रश्न विचारण्याची शिक्षा मुलांना का, असे ते विचारतात. त्यांची मुले पहिली आणि सातवीत शिकतात. त्यांना वर्गात बसू न देता रिसेप्शनजवळ दोन तास का बसवले, असा त्यांचा सवाल आहे. शाळेच्या या मग्रूर वागणुकीचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम झाला आहे, असेही ते म्हणतात. परीक्षा सुरू असताना प्रवेश नाकारून मुलांना परीक्षेपासून वंचित का ठेवले, हाही त्यांचा प्रश्न आहे.
तक्रारीनंतर शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभाग, या दोन्ही विभागांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोन्ही विभागांच्या संयुक्त पथकाने शाळेत जाऊन सखोल चौकशी केली. त्यात शाळेच्या शैक्षणिक परवानग्यांबाबत अनेक गंभीर गोष्टी लक्षात आल्या. गेली काही वर्षे ही शाळा चालवली जात असताना शाळेकडे शैक्षणिक कामासाठीची यु-डायस नोंदणीच नसल्याचे चौकशी समितीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शिवाय लहान मुलांचे शैक्षणिक अधिकार आणि त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्याबाबत जे नियम आहेत, त्यांचे या प्रकरणात सर्रास उल्लंघन झाल्याचेही समितीला आढळले आहे. आम्ही आमचा अहवाल शालेय शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाकडे सादर करणार आहोत आणि वरिष्ठांनी योग्य निर्णय घेऊन कारवाई करावी, अशी माहिती समितीतील बाल संरक्षण अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचे वारंवार प्रयत्न झाले, पण शाळेने प्रतिसाद दिला नाही.