नागपुरात मध्यरात्री हवेत गोळीबार, नंदनवन परिसरात खळबळ; आरोपीला वणी इथून अटक, दोन महिन्यांत तिसरी घटना
नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या हसनबाग भागात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हसनबाग भागात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या आवाजामुळे नंदनवन परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला. त्या तपासात पोलिसांनी आरोपी रोशन गायकवाड उर्फ गोट्या याला वणी इथून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीचा अधिक तपास केला असता, त्याच्याविरुद्ध याआधीचे नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
दरम्यान, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणातल्या कारचा नंबर शोधून काढला आणि चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. आरोपी रोशन गायकवाड यांचा हसनबाग इथल्या एका गुन्हेगाराशी वाद आहे आणि त्यातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेमुळे शहर पुन्हा एकदा हादरलं असून परिसरातल्या नागरिकांमध्ये सध्या काहीसं भीतीचं वातावरण आहे.
नागपूर आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या या जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यातली पहिली घटना 26 ऑगस्ट रोजी भांडेवाडीतल्या श्रावणनगर परिसरात घडली होती. तिथे काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि सात आरोपींना अटक केली होती.
त्यानंतर 10 सप्टेंबरच्या रात्री नागपुरातल्या बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गोटाळ-पांजरी परिसरात गोळीबार झाला. पैशांच्या जुन्या व्यवहारातून झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. या घटनेत प्रॉपर्टी डीलिंगशी संबंधित असलेले कार्तिक धार्मिक जखमी झाले होते.
अशातच आता हसनबाग फ्लायओव्हरखाली, सार्वजनिक ठिकाणी, मध्यरात्री हवेत गोळीबार झाला आहे. त्यामुळे शहरातल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नंदनवन पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.