नागपुरात नशेतील पित्याचा लाकडी बॅटच्या वाराने मृत्यू, अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात
नागपूरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पित्याचा मुलीच्या वाराने जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे गडचिरोलीत एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशाने मृत्यू झाला.
नागपूरमधील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या 45 वर्षांच्या पित्याने आपल्या 17 वर्षांच्या मुलीशी शिवीगाळ करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या कृत्याला विरोध करताना झालेल्या वादात मुलीने लाकडी बॅटने पित्याच्या डोक्यावर वार केला आणि त्यामुळे पित्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला दारूचे व्यसन होते. घटनेच्या रात्री तो दारू पिऊन घरी आला आणि मुलीशी असभ्य वर्तन करू लागला. वाद वाढल्यानंतर त्याने मुलीला मारहाणही केली. त्यानंतर स्वतःचा बचाव करताना संतापलेल्या मुलीने घरात असलेली लाकडी बॅट उचलली आणि पित्याच्या डोक्यावर गंभीर वार केला. या हल्ल्यातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला 112 नंबरवर मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी धावले. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तपासात पुढे काय माहिती उघड होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गडचिरोलीतूनही एक दुर्दैवी बातमी आहे. माओवादविरोधी मोहिमेवर तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस स्टेशन येथे घडली. राहुल प्रभाकर शिनगारे, वय 39 वर्षे, असे या जवानाचे नाव आहे. ते धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते. दीड महिन्यापूर्वी ते माओवादविरोधी मोहिमेसाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत त्यांची तैनाती करण्यात आली होती आणि रेगडी येथील कॅम्पमध्ये ते राहत होते.
6 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास ते अंघोळीसाठी गेले असताना एका विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला. सर्पदंशानंतर ते लगेच कॅम्पमध्ये परतले. अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज संपली. शिनगारे यांच्या मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.