मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:47 IST

कबुली आत्मसमर्पित नक्षली कमांडरची, नाव बदलून महाविद्यालयांतून तरुणांची भरती

आत्मसमर्पित नक्षली कमांडर विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शहरांमधल्या नक्षली नेटवर्कची कबुली दिली आहे.

कबुली आत्मसमर्पित नक्षली कमांडरची, नाव बदलून महाविद्यालयांतून तरुणांची भरती
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या तरुणांना हेरून त्यांना सशस्त्र नक्षल चळवळीकडे वळवणाऱ्या विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने एबीपी माझाच्या कॅमेरासमोर धक्कादायक कबुली दिली आहे. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबईत असताना आपण नेमकं काय काय केलं, हे त्याने स्वतःच्या तोंडून सांगितलं. आई-वडिलांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अचानक मुंबई सोडावी लागली होती. त्यानंतर तो आधी चंद्रपुरात आणि मग नागपुरात आला. नागपुरात त्याने काय उद्योग केले, याचंही धक्कादायक वास्तव या मुलाखतीतून समोर आलं आहे. नागपुरात आल्यावर विकास रामास्वामी मेकला याचा अनिल नागपुरे कसा झाला, हे बदल करताना नक्षलवाद्यांनी एका निष्पाप विद्यार्थ्याला कसं संकटात टाकलं आणि त्या विद्यार्थ्याला पोलीस कारवाईला आणि अटकेला कसं सामोरं जावं लागलं, याचीही कबुली विकासने पुन्हा एकदा दिली.

मुंबईत असताना आपलं नाव कधी विकास तर कधी नवज्योत असायचं, असं तो सांगतो. मुंबई अचानक सोडावी लागल्यामुळे ते नाव आणि सगळी कागदपत्रं तिथेच सोडून द्यावी लागली. नागपुरात आल्यावर त्याने अनिल नागपुरे हे नवं नाव धारण केलं. यासाठी त्याचा मार्गदर्शक असलेल्या मिलिंद तेलतुंबडे याने - महाराष्ट्रातला आजवरचा सर्वात मोठा नक्षली कमांडर - अनिल नागपुरे नावाच्या एका विद्यार्थ्याची कागदपत्रं आणून दिली. त्यात दहावी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला होता. ही दोन कागदपत्रं मिळाल्यावर विकासने नागपुरात आणखी काही बनावट कागदपत्रं तयार केली आणि त्या आधारावर नागपूरच्या धनवटे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

खरा अनिल नागपुरे अभ्यासात हुशार नव्हता आणि त्याला पुढे शिकायचंही नव्हतं, त्यामुळे त्याने स्वतःहून आपली कागदपत्रं मिलिंद तेलतुंबडेकडे दिली होती, असा दावा विकासने केला. नागपुरात शिकत असताना तो चंदन नगर, मेडिकल चौक भाग, पाचपावली, जरीपटका अशा वेगवेगळ्या भागात दर काही महिन्यांनी घर बदलत राहिला. नागपुरात अकरावीपासून बीएच्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्याने कुठलीही अडचण न येता शिक्षण घेतलं. मुंबईतही त्याने बीएच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं होतं, पण मुंबई सोडताना ती सगळी शैक्षणिक कागदपत्रं तिथेच राहिली, त्यामुळे नागपुरात नव्या नावाने त्याला परत अकरावीपासून सुरुवात करावी लागली.

याच काळात चंद्रपुरात त्यांचे 19 नक्षली सहकारी पोलिसांच्या हाती लागले. त्या तपासाचा धागा पकडत पोलिसांनी नागपुरातही शोधमोहीम सुरू केली आणि विकास ज्या कॉलेजमध्ये शिकत होता, तिथपर्यंत पोलीस पोहोचले. अनिल नागपुरे हे नाव कळल्यावर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पण विकास पोलिसांच्या हाती लागला नाही, त्यामुळे ज्याची कागदपत्रं वापरून तो खोट्या नावाने शिकत होता, त्या खऱ्या अनिल नागपुरेलाच पोलिसांनी अटक केली आणि अनेक दिवस त्याची चौकशी केली. तो खरा अनिल नागपुरे असून त्याची कागदपत्रं एका नक्षलवाद्याने वापरल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याची सुटका केली. मात्र तोपर्यंत विकास नागपूर सोडून गडचिरोलीच्या जंगलात सुरक्षित पोहोचला होता.

आम्ही फक्त अनिल नागपुरेची कागदपत्रं वापरली, त्याला शिक्षणात रस नव्हता, त्यामुळे त्याचं शैक्षणिक नुकसान आम्ही केलं नाही, असा दावा विकास रामास्वामीने केला. उलट त्याच्या नावावर घेतलेल्या शिक्षणात बारावीत 75 टक्के गुण मिळाले, इतके गुण खरा अनिल नागपुरे कधीच मिळवू शकला नसता, असंही तो म्हणाला.

आत्मसमर्पित नक्षली कमांडर विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबईतल्या नामांकित रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना माओवादी विचारसरणीकडे कसं आकृष्ट केलं, याचंही वास्तव या मुलाखतीत मांडलं आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागात नक्षलवादाचं जाळं कसं पसरलं आहे, याचा खुलासा या मुलाखतीतून झाला आहे. या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना नक्षलविरोधी मोहिमेचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी शहरी नक्षलवाद हे देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षेपुढचं मोठं आव्हान असल्याचं मान्य केलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ