नव्या ह्युंदाई टक्सनचा आकार वाढला, 242 hp हायब्रिड इंजिन आणि नवे सेफ्टी फीचर्स
ह्युंदाईने 2027 मॉडेलची पाचव्या पिढीची टक्सन दक्षिण कोरियात सादर केली असून आकारमान, तंत्रज्ञान आणि सुरक्षा फीचर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
ह्युंदाईने आपल्या लोकप्रिय SUV टक्सनची 2027 मॉडेलची नवी पिढी दक्षिण कोरियात लाँच केली आहे. ही टक्सनची पाचवी जनरेशन असून यात आकारमानापासून टेक्नोलॉजी आणि सेफ्टी फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या टक्सनमध्ये 242 hp क्षमतेची हायब्रिड पॉवरट्रेन, 17-इंच टचस्क्रीन आणि ह्युंदाईची Pleos Connect इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
सगळ्यात आधी बोलायचं झालं तर गाडीचा आकार वाढला आहे. नव्या टक्सनची लांबी 60 mm ने आणि रुंदी 40 mm ने वाढवण्यात आली आहे, तर व्हीलबेसमध्येही 30 mm ची वाढ झाली आहे. यामुळे मागच्या सीटवर बसणाऱ्यांना हेडरूममध्ये 29 mm जास्त जागा मिळणार आहे. मागच्या दरवाजांचा ओपनिंग अँगल आधी 73 डिग्री होता, तो आता 83 डिग्री करण्यात आला आहे, त्यामुळे आत बसणं-उतरणं आणखी सोपं होईल. गाडीचं एअरोडायनॅमिक्स सुधारण्यासाठी स्पॉयलर, व्हील डिझाइन आणि अॅक्टिव्ह एअर फ्लॅप्समध्येही बदल करण्यात आले आहेत.
केबिनमध्ये गेलं तर Pleos Connect सिस्टिमसह 12.9-इंच किंवा 17-इंच टचस्क्रीनचा पर्याय दिला आहे. यात Gleo AI नावाचा जनरेटिव्ह असिस्टंट देण्यात आला असून, ड्रायव्हर फक्त बोलून माहिती, रस्ता आणि इतर सुविधा मिळवू शकतो. Pleos App Marketमधून वेगवेगळी अॅप्सही डाउनलोड करता येतील. याशिवाय 100W USB पोर्ट, ड्युअल वायरलेस चार्जिंग आणि Bang & Olufsen ऑडिओ सिस्टिमचाही पर्याय उपलब्ध आहे.
इंजिनबाबत बोलायचं तर नव्या टक्सनमध्ये 1.6-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं आणि हे इंजिन 190 hp पॉवर देतं. हायब्रिड व्हर्जनची पॉवर आधी 231 hp होती, ती आता 242 hp पर्यंत वाढवण्यात आली आहे. ह्युंदाईच्या अंदाजानुसार हायब्रिड व्हर्जनची फ्युल कपेसिटी 5.7 लिटर प्रति 100 km इतकी आहे. हायब्रिड व्हर्जनमध्ये E-Traction ही टेक्नोलॉजीही देण्यात आली आहे.
सेफ्टीच्या बाबतीतही नव्या टक्सनमध्ये बरेच बदल झाले आहेत. अपघातानंतर गाडीची इलेक्ट्रिकल सिस्टिम बंद पडली तर दरवाजे उघडण्यासाठी आपत्कालीन पॉवर सिस्टिम देण्यात आली आहे. कमी वेगात चुकून अॅक्सिलरेटर दाबलं गेलं तर Pedal-Misuse Assist हे फीचर वेग कमी करण्यास किंवा ब्रेक लावण्यास मदत करतं. Reversing Assistant हे फीचर आधीचा रिव्हर्सिंग मार्ग लक्षात ठेवून गाडी मागे नेताना स्टीयरिंग नियंत्रित करू शकतं. प्लग-इन हायब्रिड व्हर्जनबाबतची माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही.