मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्राच्या प्रवेशाला १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत शेवटची मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ऑनलाईन प्रवेश आता १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत घेता येतील.
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राने (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशाला अंतिम मुदतवाढ दिली आहे. आता १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येतील.
केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी किमान पात्रता असलेल्यांना थेट प्रवेशाची संधी दिली जात आहे. शिकण्यात लवचिकता, परवडणारे शिक्षण शुल्क आणि युजीसी (डीईबी) व एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, हे सीडीओईचे प्रमुख उद्देश आहेत.
पदवी स्तरावर बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी) हे विषय आहेत. त्याशिवाय बीकॉम (कॉमर्स, अकाऊटंसी आणि बीझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान) आणि बीएस्सी (संगणकशास्त्र) हे अभ्यासक्रमही आहेत. या सगळ्या अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होत आहेत.
पदव्युत्तर स्तरावर एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क) उपलब्ध आहे. एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित), एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र), एमएमएस आणि एमसीए हेही अभ्यासक्रम यात येतात. पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (पीजीडीएफएम) आणि डिप्लोमा इन स्कूल मैनेजमेंट (डीएसएम) यांचाही समावेश आहे. हे सर्व पदव्युत्तर प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होत आहेत. दुहेरी पदवीचा पर्यायही केंद्रात उपलब्ध करून दिला आहे.
एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) हे दोन वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सीडीओईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सीडीओईकडून ऑनलाईन पेमेंट लिंक पाठवली जात आहे. विद्यार्थ्यांनी ठरलेल्या कालावधीत शुल्क भरले की त्यांचा प्रवेश निश्चित होईल.
केंद्रात एम.ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम मागच्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) हा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन सुरू झाला आहे. या अभ्यासक्रमांत प्रवेश प्रक्रियेपासून परीक्षेपर्यंत सगळे काही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून करता येईल. प्रवेशाचे सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर दिले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना नियमित कॉलेजात प्रवेश मिळाला नाही, अशा किमान पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रात थेट प्रवेशाची संधी दिली जात आहे. सीडीओईची विभागीय केंद्रे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी आणि पालघर येथे सुरू केली आहेत. तिथे प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले जाते आणि अध्ययन साहित्याचे वाटप होते. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी ठरलेल्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.