राज्यातून मान्सूनची माघार सुरू; मुंबईतून मान्सून परतला, उकाडा वाढला
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून पूर्णपणे परतला आहे.
राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सून हंगामातला मुंबईतला प्रवास अधिकृतरीत्या संपला आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे.
मुंबईबरोबरच विदर्भातील बहुतांश भागांतून मान्सून परतण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार पुढच्या २ ते ३ दिवसांत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, तसेच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर आग्नेय कर्नाटकच्या काही भागांतून मान्सून माघार घेईल. म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या काही दिवसांत आणखी पुढे सरकणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती अतिशय कमकुवत आहे आणि काही मोजक्याच ठिकाणी अगदी हलका पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार विदर्भातल्या सर्व ११ जिल्ह्यांत म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीममध्ये ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या काळात पूर्णपणे कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. या पाच दिवसांत विदर्भात पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
एवढेच नाही, तर ९ ऑक्टोबरपर्यंत हे कोरडे वातावरण टिकून राहण्याचा अंदाज आहे. मान्सून परतला असला तरी विदर्भातील कमाल तापमानात मोठी घट होणार नाही. सध्या या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. अमरावतीत विदर्भातील सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर वाशीममध्ये सर्वात कमी म्हणजे १९ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले.
मुंबई आणि उपनगरांत आज आकाश मुख्यत्वे निरभ्र राहिले. काही भागांत लोकांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आता विभागवार अंदाज पाहू. ४ ऑक्टोबरसाठी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहू शकते. ५ ऑक्टोबरचा अंदाजही असाच आहे. चारही विभागांत हवामान कोरडे राहील आणि कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट वातावरण असेल.
६ ऑक्टोबरला मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात त्या दिवशीही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.