'रामायण'च्या सेटवर आग; गोरेगाव फिल्म सिटीत इतर मालिकांच्या सेटचंही नुकसान
मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमध्ये सोमवारी तात्पुरत्या शूटिंग सेटला आग लागली. सुदैवाने कुणीही जखमी झालेलं नाही.
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. आता याच चित्रपटाच्या सेटवर आग लागल्याची चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटीमध्ये सोमवारी एका तात्पुरत्या शूटिंग सेटला आग लागली आणि काही वेळ परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं.
५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून २ मिनिटांनी फिल्म सिटीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. रिलायन्स मीडिया वर्क्स आणि प्राईम फोकस स्टुडिओच्या मागच्या बाजूला असलेल्या तात्पुरत्या सेटवर ही आग लागली होती.
बीएमसीच्या मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, प्राईम फोकस स्टुडिओच्या मागे सुमारे १०० बाय २० फूट आकाराचा तात्पुरता सेट उभारला होता. त्यावरच उभारलेल्या पीसीआर युनिटमध्ये आग लागली. आगीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहेत. त्यात सेटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर येताना दिसत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आग इलेक्ट्रिकल वायरिंग, इन्स्टॉलेशन आणि केबल्सपर्यंत पोहोचली. त्याशिवाय दरवाजे, लाकडी फळ्या, एसी युनिट्स, बांबू, प्लास्टिकचं साहित्य, साऊंड सिस्टीम आणि शूटिंगच्या उपकरणांचंही नुकसान झालं आहे, अशी माहिती आहे.
आगीची खबर मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी वॉर्ड कंट्रोल आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच परिस्थिती आटोक्यात आणली आणि दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणाचा जीव गेला नाही किंवा कुणी जखमीही झालेलं नाही.
या आगीचा फटका फक्त 'रामायण'च्या सेटलाच बसला असं नाही. जवळच्याच स्टुडिओमध्ये एमटीव्हीच्या 'हसल ५' आणि 'पती, पत्नी और पंगा २' या कार्यक्रमांचं चित्रीकरणही सुरू होतं. प्राथमिक अहवालानुसार, आग आधी 'पती, पत्नी और पंगा २'च्या सेटवर लागली आणि नंतर 'हसल ५'च्या सेटपर्यंत पोहोचली, असं सांगितलं जात आहे. मात्र या दोन्ही सेटचं नेमकं किती नुकसान झालं, याबद्दल अजून अधिकृत माहिती आलेली नाही.
आग लागल्यानंतरचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. त्यात सेटमधून धूर निघताना आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत. या घटनेनंतर 'रामायण'च्या सेटच्या सुरक्षेबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे भव्य सेट्स आणि निर्मिती यामुळे हा प्रोजेक्ट आधीपासूनच चर्चेत होता. आता सेटवर लागलेल्या आगीमुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.