मुंबई लोकलमधील अंतर कमी करण्यासाठी रेल्वेची 'कवच ५.०' प्रणाली, डिसेंबर २०२६ पर्यंत सुरुवातीचे नियोजन
भारतीय रेल्वे उपनगरीय सेवांसाठी 'कवच ५.०' ही स्वयंचलित सुरक्षा प्रणाली विकसित करत आहे. त्यामुळे दोन लोकलमधील अंतर कमी होऊन गर्दीच्या वेळेत जास्त फेऱ्या शक्य होऊ शकतात.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे 'कवच ५.०' ही अद्ययावत स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली विकसित करत आहे. आहे त्याच रेल्वे मार्गावर जास्त गाड्या चालवता याव्यात आणि लोकल गाड्यांमधील अंतर कमी व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. या प्रणालीमुळे गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सध्या एकामागून एक धावणाऱ्या दोन लोकलमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी ठरावीक वेळ ठेवावा लागतो. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत उपलब्ध पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे अवघड ठरते. 'कवच ५.०'मुळे दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. परिणामी, आत्ताच्या मार्गांवरच जास्त लोकल चालवणे शक्य होऊ शकते.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 'कवच ५.०'ची अंमलबजावणी डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. ही माहिती अंतर्गत कागदपत्रांच्या आधारे समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात किती अतिरिक्त फेऱ्या वाढतील, याचा अंतिम निर्णय सिग्नल व्यवस्था, उपलब्ध गाड्या, पायाभूत सुविधा आणि अंतिम परिचालन वेळापत्रक यांवर अवलंबून असेल.
या प्रणालीत चालकाला पुढील सिग्नलची माहिती, तिथपर्यंतचे अंतर आणि इतर महत्त्वाची माहिती मिळेल. गाडी परवानगी असलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावली, तर प्रणाली आपोआप ब्रेक लावू शकते. समोरून किंवा बाजूने होऊ शकणाऱ्या संभाव्य धडकेपासून संरक्षण देण्याची क्षमताही या प्रणालीत आहे. 'कवच ५.०'मुळे सध्याच्या वेळापत्रकात सुमारे ३० टक्के जास्त सेवांची क्षमता तयार होऊ शकते.
दोन लोकलमधील अंतर कमी झाल्यास फलाटांवर थांबावे लागणारा वेळ कमी होऊ शकतो. गर्दीच्या वेळेत लोकल जास्त वारंवार मिळण्याची शक्यता आहे. आहे त्या रेल्वे पायाभूत सुविधांचा जास्त कार्यक्षमतेने वापर होऊन प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढू शकते. रेल्वेच्या माहितीनुसार, 'कवच ५.०' विशेषतः उपनगरीय रेल्वे सेवांसाठी तयार केली जात आहे. कमी अंतराने धावणाऱ्या, वारंवार थांबे असलेल्या आणि खूप प्रवासी चढ-उतार करणाऱ्या लोकल सेवांसाठी या प्रणालीची रचना करण्यात आली आहे.
'कवच'चा प्रवास २०१६ मध्ये सुरू झाला. जुलै २०२० मध्ये भारताची स्वदेशी स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली म्हणून त्याचा स्वीकार झाला. २०२४ मध्ये 'कवच ४.०'ला अंतिम मान्यता मिळाली. एप्रिल २०२५ मध्ये उपनगरीय सेवांसाठी 'कवच ५.०'ची घोषणा करण्यात आली. आता मुंबईच्या लोकल सेवेत ती राबवण्याची तयारी सुरू आहे.