मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला बॉम्बहल्ल्याची धमकी, ईमेलमुळे खळबळ
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला शुक्रवारी (23 ऑक्टोबर) पुन्हा एकदा धमकीचा ईमेल मिळाला असून पोलीस तांत्रिक तपास करत आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा एकदा ईमेलवरून धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापौर कार्यालयाला शुक्रवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 11:30 वाजता हा धमकीचा ईमेल मिळाला. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महापौरांना याआधीही दोनदा असे धमकीचे ईमेल आले होते, आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या कार्यालयाला अशी धमकी मिळाली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी आलेल्या या ईमेलमध्ये पाठवणाऱ्याने स्वतःला 'खालिस्तान नॅशनल आर्मी'चा प्रतिनिधी असल्याचे म्हटले आहे. संदेशात अतिशय गंभीर दावे करण्यात आले आहेत. त्यात 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान हल्ले करण्याचा उल्लेख आहे.
ईमेलनुसार, मुंबईच्या महापौर कार्यालयावर शुक्रवारी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच एका शाळेलाही दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी बॉम्बहल्ल्याने लक्ष्य केले जाणार असल्याचे त्यात सांगितले आहे.
एवढेच नाही, तर पुढच्या काळात आणखी मोठे हल्ले करण्याचा इशाराही ईमेलमध्ये दिला आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर रोजी ग्रेनेड हल्ला आणि 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे.
ईमेल पाठवणाऱ्याने खालिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केली आहे. तसेच 1984 मधील शीखविरोधी हिंसाचाराचा संदर्भ देत, शीख समुदायाला लक्ष्य करणाऱ्यांविरुद्ध हा बदला असल्याचे निराधार आरोप संदेशात केले आहेत. हा ईमेल पाठवणारी व्यक्ती किंवा संघटना नेमकी कोण आहे, याबद्दल अजून कोणतीही अधिकृत स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. त्यामुळे राजकीय आणि सुरक्षा वर्तुळात चिंता वाढली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एकापाठोपाठ एक महत्त्वाच्या व्यक्तींना अशा धमक्या येत असल्याने मुंबई पोलिसांचा सायबर सेल आणि गुन्हे शाखा सतर्क झाली आहे. महापौरांच्या कार्यालयाची आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.